"अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणे हेच 'नवं शैक्षणिक धोरण' आहे का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 09:44 AM2024-09-17T09:44:32+5:302024-09-17T09:45:03+5:30

गेल्या काही महिन्यांपासून डॉ. अजित रानडे यांच्या  'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स' पुणे कुलगुरू पदाच्या नियुक्तीवरून वाद सुरू होता. त्यांच्या हकालपट्टीनंतर राज ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Dr. Ajit Ranade removal from the post of 'Gokhale Institute of Politics and Economics' Pune Vice-Chancellor, MNS Raj Thackeray questions the government | "अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणे हेच 'नवं शैक्षणिक धोरण' आहे का?"

"अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणे हेच 'नवं शैक्षणिक धोरण' आहे का?"

मुंबई - डॉ. अजित रानडेंसारखी व्यक्ती स्वेच्छेने शिक्षण क्षेत्रांत उतरते आणि अशा व्यक्तीला पूर्णपणे नाउमेद करणारी कृती सरकारकडून घडणार असेल, तर या क्षेत्रांत पुन्हा कुठला तज्ज्ञ आणि धडपड्या माणूस येईल?. अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणे हेच 'नवं शैक्षणिक धोरण' आहे का? असा संतप्त सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून अजित रानडे यांना हटवल्याच्या मुद्द्यांवरून राज यांनी शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलंय की, गेले २ दिवस वर्तमानपत्रामंध्ये पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून डॉ. अजित रानडे यांना अतिशय चुकीच्या पद्धतीने हटवल्याची बातमी वाचनात येत आहे. डॉ. अजित रानडेंसारख्या एका उच्चविद्याविभूषित, खाजगी क्षेत्रात खूप मोठी कामगिरी केलेल्या व्यक्तीला, अशा पद्धतीने पदावरून हटवणं हे अत्यंत चुकीचं आहे. बरं, त्यासाठी रानडे यांना १० वर्षांचा अध्यापनाचा अनुभव नाही हे कारण पुढे केलं जात आहे. मग त्यांची नियुक्ती करताना ही बाब लक्षात आली नव्हती का?, अडीच वर्ष या पदावर राहून त्यांनी जी कामगिरी केली, त्यानंतर अचानक ही आठवण कशी होते? अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशांत, त्या त्या क्षेत्रातील अनुभवी माणसं पुढे अध्यापन क्षेत्रात येतात आणि शिक्षकाला त्या व्यवस्थांमध्ये प्रचंड मानसन्मान असतो असं त्यांनी सांगितले. 

तसेच मी आत्ता अमेरिकेला गेलेलो असताना तिथल्या अनेकांशी बोलताना मला जाणवलं की, अगदी नोबेल पुरस्कार विजेते, ते एखाद्या अवाढ्यव उद्योग समूहात दीर्घकाळ उच्च पदावर काम केलेला माणूस पुढे विद्यापीठांमध्ये शिकवतो. एखाद्या विद्यापीठाचा प्रमुख होतो. तिथे त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता, अनुभव, आणि त्या व्यक्तीची कार्यक्षमता हेच निकष बघितले जातात. 'अध्यापन अनुभव' असले काहीतरी फुटकळ निकष लावले जात नाहीत.  मुळात आपल्याकडचं शिक्षण हे व्यवसाय उद्योगांना पूरक नसतं. याला दोन कारणं मला नेहमी जाणवतात की अभ्यासक्रम तयार करणारे हे त्या क्षेत्रांत काम केलेले असतातच असं नाही..आणि शिकवणारे पण त्या क्षेत्रातील अनुभवी नसतात. त्यामुळे मुलांना जे शिकवलं जातं, ते पुढे त्यांना बाहेर पडल्यावर उपयोगी पडत नाही आणि त्यांची मग ओढाताण सुरु होते. बेरोजगारांच्या फौजा तयार होतात असं सांगत राज ठाकरेंनी शिक्षण व्यवस्थेवर टीका केली आहे. 

दरम्यान, जरी हा विषय थेट राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नसला तरी केंद्रातील सरकारकडे राज्य सरकारने बोललं पाहिजे आणि यूजीसीने केलेली चूक सुधारलीच पाहिजे. शिक्षण क्षेत्रांत फार मूलभूत काम करणं जर शक्य नसेल तर किमान अशा गोष्टींतून चुकीचे पायंडे पडतील आणि समाजातील बुद्धिमान लोकं नाऊमेद होणार नाहीत इतकं तरी सरकारने पाहावं अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांकडे केली आहे. 

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ.अजित रानडे यांची 'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स' पुणेच्या कुलगुरू पदावरून हकालपट्टी करण्यात आली. अध्यापनाच्या अनुभवाशी संबंधित पात्रता निकषांची पूर्तता केली नसल्याचं कारण देत रानडे यांना दूर करण्यात आलं. संस्थेच्या म्हणण्यानुसार रानडे यांची नियुक्ती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांचे उल्लंघन करते. रानडेंची उमेदवारी यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विहित निकषांशी जुळत नाही, म्हणून त्यांना या पदावरून हटवण्यात येत आहे असं संस्थेने रानडे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स ही भारतातील सर्वात जुनी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे. तर संस्थेचा निर्णय हा खरोखरच दुर्दैवी आणि धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया डॉ. अजित रानडे यांनी दिली आहे. 
 

Web Title: Dr. Ajit Ranade removal from the post of 'Gokhale Institute of Politics and Economics' Pune Vice-Chancellor, MNS Raj Thackeray questions the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.