डॉ. आंबेडकर स्मारकाची परवानगी लटकलेलीच!
By admin | Published: December 24, 2016 05:28 AM2016-12-24T05:28:34+5:302016-12-24T05:28:34+5:30
इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक असून त्यासंबंधीचा
मुंबई : इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक असून त्यासंबंधीचा प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडून केंद्रीय पर्यावरण विभागाला पाठवावा, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे सांगितले.
सामाजिक न्याय विभागाशी संबंधित विविध विषयांवर आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. पर्यावरणविषयक परवानगीसाठी केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांबरोबर एका महिन्यात बैठक घेऊ. तसेच राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाला देण्यात येणाऱ्या टीडीआर हस्तांतरणाचा प्रश्नही लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे आठवले यांनी या वेळी सांगितले. राज्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात यावेत. तसेच सध्या राज्यात किती प्रलंबित प्रकरणे आहेत, त्याची माहिती गोळा करावी, असे निर्देशही आठवले यांनी या वेळी दिले.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी या वेळी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने यासंबंधी कायदा तयार करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश दिले. तसेच केंद्र शासनाकडून राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने मिळावी, अशी मागणीही त्यांनी आठवले यांच्याकडे केली. (विशेष प्रतिनिधी)