अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. चांदेकर यांची नियुक्ती
By admin | Published: June 1, 2016 09:16 PM2016-06-01T21:16:02+5:302016-06-01T21:35:24+5:30
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. मुरलीधर चांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. चांदेकर यांच्या नियुक्तीची
Next
>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. मुरलीधर चांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. चांदेकर यांच्या नियुक्तीची घोषणा बुधवारी केली.
नागपूर येथील व्हीएमव्ही कॉमर्स, जेएमटी आर्ट व जेजेटी सायन्स कॉलेज येथे प्राचार्य असलेल्या डॉ. चांदेकर यांची नियुक्ती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.
डॉ. मोहन खेडकर यांचा कार्यकाळ दिनांक 23 फेब्रुवारी २०१6 रोजी संपल्यानंतर डॉ. विलास सपकाळ यांच्याकडे पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता.
डॉ. चांदेकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून एम. कॉम, एम. फिल तसेच पीएच. डी प्राप्त केली असून त्यांना शिक्षण, संशोधन व प्रशासनाचा व्यापक अनुभव आहे.
नव्या कुलगुरुच्या निवडीसाठी राज्यपालांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. रमेश सुरजमल गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली एक शोध समिती स्थापन केली होती. दिल्लीच्या राष्ट्रीय वैद्यकीय सांख्यिकी संस्थेचे संचालक डॉ. अरविंद पांडे तसेच महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंद कुमार हे समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या सर्व उमेदवारांच्या मुलाखती आज राज्यपालांनी घेतल्यानंतर डॉ. चांदेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.