डॉ. बालाजी तांबे यांची पदवीच सापडेना
By admin | Published: August 13, 2016 03:03 AM2016-08-13T03:03:36+5:302016-08-13T03:03:36+5:30
देश, विदेशात आयुर्वेदाचा मंत्र सांगणारे डॉ. बालाजी ऊर्फ भालचंद्र तांबे यांची आयुर्वेदातील पदवीच महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसीनच्या दप्तरी जमा (एमसीआयएम) नसल्याची धक्कादायक
- सुधीर लंके, अहमदनगर
देश, विदेशात आयुर्वेदाचा मंत्र सांगणारे डॉ. बालाजी ऊर्फ भालचंद्र तांबे यांची आयुर्वेदातील पदवीच महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसीनच्या दप्तरी जमा (एमसीआयएम) नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे डॉ. तांबेही आपणाकडून ही पदवी गहाळ झाल्याचे सांगत आहेत. त्यामुळे तांबे यांच्या पदवीबाबतच संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.
डॉ. तांबे यांनी ‘आयुर्वेदिय गर्भसंस्कार’ या पुस्तकात पुत्रप्राप्तीबाबतचा प्रचार करून गर्भलिंग निदान कायद्याचा भंग केल्याची तक्रार ‘बोगस डॉक्टर’ या विषयावर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी नगरच्या जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे. या तक्रारीची शहानिशा करून त्यात तथ्य आढळल्याने संगमनेरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉ. तांबे, पुस्तकाचे प्रकाशक अभिजित पवार व विक्रेता संदीप मुळे यांच्याविरुद्ध गर्भलिंग निदान कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्याच्या न्यायालयीन लढाईसाठी आरोग्य विभागाने डॉ. तांबे यांच्या वैद्यकीय पदवीची शहानिशा सुरू केली आहे. मात्र, नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना यासंदर्भातील काहीही कागदपत्रे ‘एमसीआयएम’कडून मिळायला तयार नाहीत. गणेश बोऱ्हाडे यांनीही माहिती अधिकारात डॉ. तांबे यांचे वैद्यकीय सेवेसाठीचे नोंदणी प्रमाणपत्र व वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मागितले. मात्र, ‘एमसीआयएम’ने तांबे यांचे १९८७ सालचे संगणकीय नोंदणी प्रमाणपत्र तेवढे दिले. या प्रमाणपत्रावर तांबे यांचे नाव भालचंद्र वासुदेव तांबे असे आहे.
‘एमसीआयएम’ने या वर्षी दोनदा तांबे यांच्याशी पत्रव्यवहार करून शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे मागितली. मात्र वैद्यविशारद पदवीऐवजी त्यांनी अभियांत्रिकी व दहावीचे प्रमाणपत्र पाठविले आहे.
वैद्यकीय प्रमाणपत्रच
मिळत नसल्याने तांबे यांनी १९८७ साली ‘एमसीआयएम’कडे नोंदणी कशाच्या आधारे केली, हा प्रश्न निर्माण झाला आहे. १९९१ नंतर त्यांनी
नोंदणीचे नूतनीकरणच केलेले नसतानाही ते वैद्य म्हणून सेवा
करत आहेत व आरोग्य विभागही त्यास हरकत घेत नाही हेही विशेष.
‘प्रयाग’च्या पदवीवरच आहे बंदी
- १९६५ साली उत्तर प्रदेशातील प्रयाग येथील हिंदी साहित्य संमेलन या संस्थेची ‘वैद्यविशारद’ पदवी आपण मिळविलेली आहे, असे तांबे सांगतात. त्याआधारे १९८७ साली त्यांची महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसीनकडे ‘आय-१८३११’ या क्रमांकाने नोंदणी झाली. या प्रमाणपत्रावर मात्र त्यांच्या पदवीचे वर्ष जानेवारी १९६३ दिसते. १९६७ नंतर हिंदी साहित्य संमेलन या संस्थेची पदवीच इंडियन मेडिकल सेंटर कौन्सिलने अवैध ठरविलेली आहे. तत्पूर्वीही ही संस्था कुठलेही शिक्षण अथवा प्रात्यक्षिक न घेता ‘वैद्यविशारद’ व ‘आयुर्वेदरत्न’ या दोन पदव्यांसाठीच्या केवळ परीक्षा घेत होती, असे सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालपत्रात म्हटले आहे. या संस्थेच्या पदव्यांवरच अनेक आक्षेप उपस्थित झालेले आहेत.
बालाजी तांबे यांचे पदवी प्रमाणपत्र आमच्याकडे नाही. त्यांच्याकडे आम्ही दोनदा मागणी केली आहे. प्रयाग येथील हिंदी साहित्य संमेलन या संस्थेशीही आम्ही पदवीची खातरजमा करण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. त्या उत्तराच्या प्रतीक्षेत आहोत. १९९१ नंतर तांबे यांनी आमच्याकडे नूतनीकरण केलेले नाही.
- डॉ. दिलीप वांगे, प्रबंधक, महाराष्ट्र कौन्सिल आॅफ इंडियन मेडिसीन, मुंबई