भायखळ्यातील डॉ. आंबेडकर मार्ग बहरला
By admin | Published: September 10, 2016 01:47 AM2016-09-10T01:47:08+5:302016-09-10T01:47:08+5:30
दक्षिण मुंबईतील भायखळ्यापासून परळपर्यंत विस्तारलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग हिरवळीने बहरला आहे.
मुंबई : दक्षिण मुंबईतील भायखळ्यापासून परळपर्यंत विस्तारलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग हिरवळीने बहरला आहे. या मार्गावरील उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण केल्याने येथील अस्वच्छताही दूर झाली असून, स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
याआधी उड्डाणपुलाखाली गर्दुल्ल्यांनी ठाण मांडत अस्वच्छतेचे वातावरण निर्माण केले होते. याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उचलत महापालिकेच्या ई वॉर्डला सुशोभीकरण करण्याची मागणी केली होती. तसा पत्रव्यवहारही केला होता. दरम्यान, ‘लोकमत’ने या प्रश्नाला वाचा फोडली होती. अखेर प्रशासनाने सुशोभीकरण करत मागणी मान्य केली, अशी माहिती मनसे विभागाध्यक्ष विजय लिपारे यांनी दिली.
लिपारे म्हणाले की, महापालिका सहायक आयुक्त यांनी मागणी पूर्ण करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली; शिवाय उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण करत स्थानिकांची समस्या दूर केली आहे. तरी भविष्यात ही हिरवळ कायम राहावी, यासाठी मनसे लक्ष ठेवून असेल, असे लिपारे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)