डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला पुनाळेकरांकडूनच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 02:42 AM2019-11-21T02:42:55+5:302019-11-21T02:43:20+5:30
सीबीआयच्या दोषारोपपत्रातून स्पष्ट
पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी शरद कळसकर याला अॅड. संजीव पुनाळेकर यांनी गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिला होता. विक्रम भावे याने कळसकर आणि सचिन अंदुरेसह घटनास्थळाची रेकी केल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल करण्यात आलेल्या दोषारोपत्रातून स्पष्ट झाली आहे. ३ सप्टेंबर २०१६ डॉ. वीरेंद्रसिंग तावडे व त्यानंतर १९ फेब्रुवारी २०१९ रोजी शरद कळसकर व सचिन अंदुरे यांच्याविरोधात दुसरे दोषारोपपत्र दाखल केले होते.
सीबीआयचे तपास अधिकारी आर. आर. सिंग आणि विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात दाखल झालेले तिसरे दोषारोपपत्र आहे. पुनाळेकर आणि भावे यांच्या विरोधात बुधवारी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारा कळसकर याला गुन्ह्यातील शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला पुनाळेकर यांनी दिला. त्यानुसार कळसकर याने ठाणे येथील खाडी पुलावरून शस्त्र तुकडे करून फेकून दिले. भावे याने घटनास्थळाची रेकी करण्यास मदत केली. हत्या केल्यानंतर तेथून कसे फरार व्हायचे याबाबत कळसकर आणि अंदुरे यांना मार्गदर्शन केल्याचे सीबीआयने दोषारोपपत्रातून स्पष्ट केले आहे.
कळसकरची सीबीआयला माहिती
कळसकर याने दुसऱ्या प्रकरणाच्या तपासात दिलेल्या कबुलीजबाबावरून अॅड. पुनाळेकर आणि भावे यांना मे महिन्यात अटक करण्यात आली होती. अॅड. पुनाळेकर यांना जमीन देण्यात आला आहे, तर भावे अद्याप न्यायालयीन कोठडीत आहे. कळसकर याची न्यायवैद्यकीय चाचणी घेण्यात आली तेव्हा चाचणीत मी आणि साथीदार अंदुरेने डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती कळसकरने सीबीआयला दिली होती.