डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : सचिन अंदुरेला स्पॉटवर नेऊन सीबीआयने केला तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 08:36 PM2018-08-31T20:36:39+5:302018-08-31T20:56:21+5:30
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून नेमका कशा प्रकारे केला याची माहिती घेण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी शुक्रवारी दुपारी आरोपी सचिन अंदुरे याला पुण्यात घेवून आले होते.
पुणे : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून नेमका कशा प्रकारे केला याची माहिती घेण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अधिकारी शुक्रवारी दुपारी आरोपी सचिन अंदुरे याला पुण्यात घेवून आले होते. खून करण्यात आलेल्या ओंकारेश्वर मंदिराजवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलावरील त्या स्पॉट आणि परिसरात अंदुरेला पायी फिरवून त्याच्याकडून माहिती घेण्यात आली.
सीबीआय कोठडी मिळाल्यानंतर अंदुरे याला अज्ञात स्थळी ठेवण्यात येत असून त्याकडे तपास करण्यात येत आहे. शुक्रवारी सीबीआयचे पथक अत्यंत गोपनीय पध्दतीने अंदुरेला पुलावर घेवून आले. सुमारे पंधरा मिनिट त्याठिकाणी पाहणी केल्यानंतर त्याला तेथून घेऊन जाण्यात आले. या काळात डॉ. दाभोलकर यांच्यावर नेमक्या कशा पद्धतीने गोळ्या झाडण्यात आल्या? अटक आरोपींपैकी कोण-कोण त्या ठिकाणी उपस्थित होते? दुचाकी कोण चालवत होते? कोणी किती गोळ्या झाडल्या? अंदुरे यांचा नेमका काय सहभाग होता? हत्या केल्यानंतर तेथून कोणत्या मार्गे फरार झाले? आदी माहिती अंदुरेकडून घेण्यात आल्याचे समजते.
डॉ. नरेंद्र यांचा २० आॅगस्ट २०१३ रोजी ओंकारेश्वर मंदिराजवळील वि. रा. शिंदे पुलावर काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून खून केला होता. नालासोपारा स्फोटके प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने शरद कळसकर याला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे केलेल्या तपासात कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांनी दुचाकीवरून येत डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून खून केल्याचे सीबीआयने केलेल्या तपासातून उघडकीस आले आहे. त्यानुसार सीबीआयने याप्रकरणी १८ आॅगस्ट रोजी औरंगाबाद येथून सचिन अंदुरेला अटक केली आहे. सध्या तो सीबीआय कोठडीत असून या गुन्ह्यांच्या अनुशंगाने तपास करण्यासाठी सीबीआय त्याला खून झालेल्या ठिकाणी घेवून गेले होते.
सीबीआय पथक चार ते पाच वाहनांमधून शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ओंकारेश्वर पूलावर दाखल झाले. पथकाने काळा बुरखा घातलेल्या अंदुरेला शिंदे पूलावर ज्या ठिकाणावर डॉ. दाभोलकरांवर गोळीबार झाला तेथे आणले. तेथून त्याला पथकाने पायी शिंदे पार चौकाच्या दिशेने नेले. तेथून परत ओंकारेश्वर मंदिरासमोरील चौकातून शनिवार पेठेतील साधना मिडिया सेंटरच्या दिशेने घेवून गेले. त्यानंतर तेथून पुन्हा वळवून त्याला शनिवार पेठ पोलीस चौकी समोरून ज्या ठिकाणी डॉ. दाभोलकरांचा खून करण्यात आला तेथे घेवून आले. या घडामोडीदरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी थांबवून सीबीआयचे तपास पथकातील अधिकारी त्याच्याकडून माहिती घेत होते.
याप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला. दरम्यान, अंदुरेला दिलेली सीबीआय कोठडी उद्या (शनिवार) संपत असून त्याला पुन्हा शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी अमोल काळे, अमित दिग्वेकर, राजेश बंगेरा या तिघांना बेंगळुरू येथून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात येथील जिल्हा न्यायालयात शुक्रवारी हजर करण्यात येणार आहे. या तिनही आरोपींना शुक्रवारी हजर करण्यात येणार होते. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना शुक्रवारी हजर करणे शक्य न झाल्याने आता शनिवारी न्यायालयात घेवूून येणार आहेत.
पुलावर कडक पोलीस बंदोबस्त
अंदुरेला स्पॉटवर नेल्यानंतर ओंकारेश्वर मंदिर परिसर आणि शिंदे पूलावर स्थानिक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. मोठ्या संख्येने पोलीस जमा झाल्याचे पाहून तेथून जाणारे लोक वाहने थांबवून नेमकं काय सुरू आहे हे पाहत होते. दरम्यान, अंदुरे आणि त्याचा साथीदार हा पुणे शहरात कसे आले? त्याने डॉ. दाभोलकर यांचा खून कसा केला आणि त्यानंतर ते कोठून कसे पळाले यांची माहिती अंदुरेकडून घेत सीबीआय पथकातील अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी जावून पंचनामा करीत असल्याचे या घटनाक्रमांवरून दिसून येते.
तपासाचे व्हिडीओ शुटिंग
डॉ. दाभोलकरांचा खून करण्यात आला त्या ठिकाणी आणल्यानंतर अंदुरेला पुन्हा शनिवार पेठ चौकीसमोर उभ्या असलेल्या वाहनांमध्ये बसवून शिंदे पारच्या दिशेने नेण्यात आले. सुमारे १५ मिनीटे सुरू असलेल्या या तपासाचे सीबीआयनेच् सर्व प्रकाराचे फोटो काढले आणि व्हिडिओ शुटिंग केले.