ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. एकनाथ पवार; राज्य शासनाने काढले आदेश
By संतोष आंधळे | Published: June 20, 2024 06:50 PM2024-06-20T18:50:05+5:302024-06-20T18:50:20+5:30
डॉ पवार जे जे रुग्णलायातील ऑर्थोपेडिक विभागप्रमुख पदाचे काम सांभाळून ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार सांभाळणार आहे.
मुंबई : पुणे येथील ससून रुग्णालयात गैरकृत्याची मालिका थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण विभागाने ससून रुग्णालयाचा अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार बारामती येथील अहिल्यादेवी होळकर शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे दिला होता. वैद्यकीय शिक्षण विभागाने गुरुवारी डॉ. म्हस्के यांच्याजागी जे जे रुग्णालयाचे ऑर्थोपेडिक विभागप्रमुख डॉ एकनाथ पवार यांना ससून रुग्णालयाचा अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचे आदेश काढले.
डॉ. पवार गेली २० वर्षापेक्षा अधिक वर्ष शासकीय सेवेत असून ९ वर्षे ते जे जे मध्ये ऑर्थोथपेडिक विभागात कार्यरत आहेत. काही वर्षांपासून त्यांनी विभाग प्रमुख पद सांभाळले होते. याप्रकरणी डॉ पवार यांनी लोकमत शी बोलताना सांगितले की, " शासनाच्या आदेशान्वये मी शुक्रवारी या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहे. या ठिकाणी काम करणे आव्हान असले तरी रुग्णालयातील सर्व सहकाऱ्याच्या सोबतीने काम करणार आहे. या ठिकाणी खूप करण्याची गरज आहे. आता पदभार स्वीकारल्यानंतर सर्व गोष्टी आढावा घेतल्यानंतर कोणत्या गोष्टीवर भर द्यायचा ते निश्चित करणार आहे. "
डॉ. पवार जे. जे. रुग्णलायातील ऑर्थोपेडिक विभागप्रमुख पदाचे काम सांभाळून ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार सांभाळणार आहे. पुणे येथील कल्याणीनगर अपघात प्रकरणात आरोपीच्या रक्तनमुन्यात फेरबदल केल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि शिपायास पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने या तिघांना सुद्धा सेवेतून निलंबित केले होते. तसेच रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले होते. त्यानंतर त्या ठिकाणी बारामती येथील शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे ससून रुग्णालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता.