डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच प्रेरणास्थान - आमीर खान
By Admin | Published: April 10, 2016 03:19 AM2016-04-10T03:19:33+5:302016-04-10T03:19:33+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्भय होते. त्यांनी प्रेमासह सहचाराची, मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि मानवतेचा विचार केला. बाबासाहेबांनी आयुष्यात कधीच हार मानली
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे निर्भय होते. त्यांनी प्रेमासह सहचाराची, मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांवर प्रेम केले आणि मानवतेचा विचार केला. बाबासाहेबांनी आयुष्यात कधीच हार मानली नाही. ते निर्भय होते. म्हणून आजही मला अडचणी आल्या किंवा समस्यांना सामोरे जावे लागले. परिस्थिती अत्यंत कठीण झाली की मी बाबासाहेबांची आठवण काढतो. त्यामुळे मला प्रेरणा मिळते. म्हणून बाबासाहेब हेच माझे प्रेरणास्थान आहेत, असे उद्गार बॉलीवूड अभिनेते आमीर खान याने काढले.
राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या वतीने वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीएच्या मैदानावर शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या ‘बाबासाहेबांच्या विचारांचा महोत्सव’ या कार्यक्रमात आमीर खान बोलत होता. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आणि अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, नेपाळचे कॅबिनेट मंत्री विश्वेंद्र पासवान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर, ज्येष्ठ संगीतकार हरिहरन, संगीतकार जतीनललित, नाटयनिर्माते राहुल भंडारे, मुंबई स्टॉक एक्सचेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चव्हाण, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
विश्वेंद्र पासवान यांनी उपस्थितांना बाबासाहेबांची समता, बंधुता आणि न्यायाची शिकवण अंमलात आणावी, असे आवाहन केले. प्रकाश आंबेडकर यांनीही परिवर्तनाची भावना कृतीत आणण्यासह पुस्तकातील बाबासाहेब माहिती करून घ्या, असे आवाहन केले. शिवाय रोहित वेमुला याची आई येत्या १४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता आंबेडकर भवन येथे बौद्ध धर्माची दिक्षा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. हर्षदीप कांबळे यांनी पुढील पंचवीस वर्षे आमची समिती विद्यार्थ्यांच्या आणि उद्योजकांच्या मदतीसाठी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असल्याचे नमुद केले. दरम्यान, यावेळी गायक अभिजित कोसंबी, गायिका रैना अग्नी, तबलानवाज मुकेश जाधव आणि श्याम जावडा या कलाकारांनी आपआपली कला सादर करत रसिकप्रेक्षकांचे तब्बल पाच तास मनोरंजन केले. शिवाय यावेळी कलाकार राजेश ढावरे यांच्या ‘द ट्रू सन आॅफ इंडिया : डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या अल्बमचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)
आमीर खान याने आपल्या भाषणाची सुरुवातच ‘जय भीम...’ असे म्हणत केली. तो म्हणाला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मला बोलावण्यात आले याचा आनंद आहे. त्यामुळे मी आयोजकांचे आभार मानतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पुरुष होते. बाबासाहेब केवळ दलितांचे नाही तर विश्वाचे नेते आहेत. बाबासाहेबांना मी माझे नेते मानतो. त्यांनी समानतेची शिकवण दिली असून, आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. बाबासाहेबांनी आपणाला जी शिकवण दिली. जे विचार दिले. ते सत्यात उतरवण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या मार्गावर चालण्याची गरज आहे. विशेषत: बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना त्यांची पुस्तकेही वाचा, असे आवाहन आमीर याने केले.