डॉ लकडावालांनी आम्हाला मूर्ख बनवलं, इमान अहमदच्या बहिणीचा आरोप
By admin | Published: April 25, 2017 08:16 AM2017-04-25T08:16:27+5:302017-04-25T09:16:33+5:30
जगातील सर्वांत लठ्ठ महिला म्हणून ओळखली जाणारी इजिप्तची इमान अहमद सध्या आजारी असून सैफी रुग्णालयाकडून तिची व्यवस्थित काळजी घेतली जात नसल्याचा आरोप तिच्या बहिणीकडून केला जात आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - जगातील सर्वांत लठ्ठ महिला म्हणून ओळखली जाणारी इजिप्तची इमान अहमद सध्या आजारी असून सैफी रुग्णालयाकडून तिची व्यवस्थित काळजी घेतली जात नसल्याचा आरोप तिच्या बहिणीकडून केला जात आहे. इमान अहमदची बहिण शायमा सेलिमने यासंबंधी एक व्हिडीओदेखील जारी केला आहे. 14 एप्रिल रोजी रेकॉर्ड करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये त्यांनी डॉ मुफझ्झल लकडावाला खोटं बोलत असल्याचा आरोप केला आहे. डॉ लकडावाला यांनी इमानचं वजन कमी करण्याचं आणि ठणठणीत बरी करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांनी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असल्याचं शायमा सेलिम बोलल्या आहेत.
यासंबंधी रुग्णालयाने आपली बाजू मांडली असून आम्ही दोन आठवड्यांपुर्वीच इमान अहमद यांना पुन्हा इजिप्तला परत घेऊन जाऊ शकता असं कळवलं होतं, मात्र तेव्हापासूनच शायमा यांनी हा व्हिडीओ पसरवत डॉक्टरांची बदनामी करत असल्याचं सांगितलं आहे.
"माय मेडिकल मंत्रा" वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार शायमा यांनी इमान अहमदचं वजन कमी करण्यात आल्याच्या दाव्याला आव्हान दिलं आहे. "इमान अहमदला रुग्णालयात भर्ती कऱण्यात आल्यापासून तिचं वजनच केलेलं नाही. जर त्यांनी तसं केलं असल्यास ते सिद्ध करावं", असं शायमा सेलिम यांनी म्हटलं आहे.
इजिप्तहून तब्बल २५ वर्षानंतर क्रेनच्या सहाय्याने घरातून बाहेर पडलेली इमान मुंबईत ११ फेब्रुवारी रोजी दाखल झाली. त्यावेळेस, तिचे वजन ५०० किलो होते. आता मात्र इमानच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होत असल्याची माहिती सैफी रुग्णालयाचे डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली होती. इमान अहमदवर ७ मार्च रोजी वजन कमी करण्यासाठी बेरिएट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण या शस्त्रक्रियेपूर्वीत तिच्या आहार आणि औषधोपचारामुळे अवघ्या महिनाभरातच वजन घटवले होते. डाएट आणि औषधोपचाराद्वारे एकूण १६० किलो वजन घटवण्यात आले होते.
हा व्हिडीओ दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया डॉ मुफझ्झल लकडावाला यांनी दिली आहे. जेव्हापासून आम्ही इमानला पुन्हा तिच्या घरी इजिप्तला पाठणव्यासंबंधी सांगितलं आहे, तेव्हापासून शायमा आम्हाला लोकांसमोर जाण्याची धकमी देत बदनामी करत असल्याचं सांगितलं आहे. "एक बेरिएट्रिक सर्जन म्हणून मी माझं उत्तम काम केलं आहे. पण न्यूरॉलॉजिकलसंबंधी मी तज्ञ नाही. इमान अहमदला घरी पाठवण्याआधी सीटी स्कॅन करण्यात येणार आहे", अशी माहिती त्यांनी दिली.
डॉ लकडावाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, "24 एप्रिल रोजी सकाळी जेव्हा इमानचं वजन करण्यात आलं तेव्हा ते 171 किलो होतं". इमानला असलेल्या मज्जासंस्थेसंबंधीच्या समस्यांबद्दल आम्हाला पुरेपूर माहिती नसल्याने सीटी स्कॅन करण्यात येणार आहे. रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तिला घरी पाठवू. इमानला फिजिओथेरपीची गरज असून तिला चालणं कधी शक्य होईल हे सांगणं कठीण आहे. ती आता व्यवस्थित श्वास घेऊ शकते, बसू शकते. तिच्यामध्ये इतक्या सुधारणा होऊनदेखील जर तिची बहिण असं वागत असेल तर त्या आम्हाला गृहित धर आहेत", अशी खंत डॉ लकडावाला यांनी व्यक्त केली.