डॉ. लकडावाला यांना जगभरातून संदेश
By admin | Published: March 2, 2017 05:41 AM2017-03-02T05:41:50+5:302017-03-02T05:41:50+5:30
इजिप्तहून बेरिएट्रीक सर्जरीसाठी मुंबईत दाखल झालेल्या ३६ वर्षीय इमान अहमदवर सध्या सैफी रुग्णालयात उपचार सुरु आहेत
मुंबई : इजिप्तहून बेरिएट्रीक सर्जरीसाठी मुंबईत दाखल झालेल्या ३६ वर्षीय इमान अहमदवर सध्या सैफी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुप्रसिद्ध डॉ. मुफ्फजल लकडावाला त्यांच्या १३ जणांच्या चमूसह इमानवर उपचार करीत आहेत. मात्र आता जगभरातील पॅरिस, जपान, जर्मनी, श्रीलंका, स्वित्झर्लंड अशा विविध ठिकाणच्या रुग्णांचे डॉ. मुफ्फजल लकडावाला यांना उपचारांसाठी मदत मिळवण्यासाठी संदेश येत आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
डॉ.लकडावाला यांच्याकडे इ-मेलद्वारे येणाऱ्या संदेशांमध्ये आम्हाला आपण कोणत्याप्रकारची मदत करु शकता असे प्रश्न रुग्णांनी विचारले आहेत. मात्र सध्या या रुग्णांवर उपचार सुरु असल्याने त्याकडेच पूर्ण लक्ष देण्यात येईल अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. ३६ वर्षीय इमान अहमद बेरिएट्रिक सर्जरीसाठी दाखल झाली आहे. ५०० किलो वजन असलेल्या इमानचे सैफी रुग्णालयात दाखल झाल्यापासून अवघ्या १२ दिवसांत ५० किलो वजन घटले आहे. तिच्यापाठोपाठ मध्य प्रदेशच्या पोलीस दलातील पोलीस निरीक्षक दौलतराम जोगावत सोशल मीडियाच्या माध्यमातून वैद्यकीय मदतीसाठी आवाहन करून सैफी रुग्णालयात दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)