डॉ. नागेंद्र, देगलूरकर ‘श्री गुरुजी’ पुरस्काराचे मानकरी
By admin | Published: February 28, 2017 03:29 AM2017-02-28T03:29:10+5:302017-02-28T03:29:10+5:30
यंदाचा श्रीगुरुजी पुरस्कार ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर व डॉ. एच.आर. नागेंद्र यांना जाहीर झाला आहे
डोंबिवली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा यंदाचा श्रीगुरुजी पुरस्कार ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर व डॉ. एच.आर. नागेंद्र यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा ५ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृहात होणार आहे.
समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत उत्तुंग कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थांना जनकल्याण समितीतर्फे संघाचे द्वितीय सरसंघचालक स्व. माधव सदाशिव गोळवलकर तथा प.पू. श्री गुरुजी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे यंदाचे बाविसावे वर्ष आहे. २१ वर्षांत ६० व्यक्ती अथवा संस्थांना सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी समाजजीवनाची १० क्षेत्रे निश्चित करण्यात आली असून त्यांची पाच गटांत विभागणी केली आहे. प्रतिवर्ष एकेका गटातील दोन क्षेत्रांसाठी पुरस्कार दिला जातो. वाङ्मय व सेवा गट, क्रीडा व कृषी, कला व समाजप्रबोधन, धर्म-संस्कृती व अनुसंधान, पर्यावरण व महिला सक्षमीकरण या पाच गटांतील दोन क्षेत्रे निवडली जातात.
यंदाच्या वर्षी पुरस्कारासाठी धर्म-संस्कृती क्षेत्रासाठी पंढरपूरचे ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर, तर अनुसंधान क्षेत्रासाठी बंगळुरूच्या स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थेचे डॉ. एच.आर. नागेंद्र यांची निवड झाली आहे. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व एक लाख रुपयांचा धनादेश, असे आहे.
या पत्रकार परिषदेला संघाच्या कोकण संभाग उपाध्यक्ष अलका जोगळेकर, बाळकृष्ण महाराज पाटील, दादासाहेब कल्लोळकर, दिगंबर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
>श्रीगुरुजी पुरस्कार वितरण सोहळ््याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर तर प्रमख वक्ते म्हणून रा.स्व. संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे (बंगळुरू) उपस्थित राहणार आहेत.