नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी डॉ. भटकर

By admin | Published: January 29, 2017 05:06 AM2017-01-29T05:06:42+5:302017-01-29T05:06:42+5:30

‘परम’ या भारताच्या पहिल्या सुपर कॉम्प्युटरचे निर्माते, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Dr. Nalanda University Vice President Stray | नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी डॉ. भटकर

नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी डॉ. भटकर

Next

पुणे : ‘परम’ या भारताच्या पहिल्या सुपर कॉम्प्युटरचे निर्माते, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुढील तीन वर्षांसाठी ही नियुक्ती केली आहे.
कुलपतीपदी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत, डॉ. भटकर म्हणाले, ‘तक्षशिला व नालंदा या आद्य विद्यापीठांविषयी मी यापूर्वी अनेकदा बोललो होतो, पण या विद्यापीठाच्या कुलपतीपदी निवड होईल, असे वाटले नव्हते. त्यामुळे खूप आनंद झाला आहे. एक स्वप्न पूर्ण झाले. ही खूप मोठी जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली आहे. नालंदा विद्यापीठाचे पुनरुत्थान करणे आव्हानात्मक आहे. काळाच्या ओघात भारतीय उच्च संस्कृती टिकून राहिली, कारण ती ज्ञानाधिष्ठित आहे. संस्कृतीचे विचार मौल्यवान आहेत. त्यामुळे या विद्यापीठांचा वाटा मोठा राहिला आहे.’
मागील दोन महिन्यांपूर्वी जॉर्ज यिओ यांनी राजीनामा दिल्याने कुलपतीपद रिक्त झाले होते. डॉ. भटकर हे २५ जानेवारी २०१७ पासून नालंदा विद्यापीठाचे कुलपती असतील. भारताच्या पहिल्यावहिल्या सुपरकॉम्प्युटरचे निर्माते आणि आयटी लीडर म्हणून डॉ. भटकर यांचा नावलौकिक आहे. त्यांना पद्मभूषण, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. ‘सी-डॅक’ या संस्थेचे संस्थापक, कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी देशाच्या संगणक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. विविध राष्ट्रीय संस्थांच्या निर्मितीतही त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. केंद्र सरकारच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून डॉ. भटकर यांनी काम केले आहे. तसेच कौन्सिल फॉर सायन्टिफिक अ‍ॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर) या संस्थेच्या नियामक परिषदेचेही ते सदस्य होते. यांसह विविध राष्ट्रीय संस्थांमध्येही त्यांनी योगदान दिले आहे.

नालंदा विद्यापीठाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या विद्यापीठामध्ये जगभरातील विद्यार्थी यायला हवेत. त्यासाठी वैश्विक शिक्षण मिळायला हवे. सर्व भाषा, संस्कृतीची देवाणघेवाण, अभ्यास होणे आवश्यक आहे. त्यासाठी तसे अभ्यासक्रम तयार करून वातावरण निर्माण केले जाईल, असे डॉ. भटकर यांनी सांगितले.

Web Title: Dr. Nalanda University Vice President Stray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.