डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: पिस्तुलांबाबत सीबीआयचा गोलमाल?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 09:40 PM2018-09-17T21:40:56+5:302018-09-17T21:42:32+5:30
दाभोलकर यांच्या हत्येसाठी नेमके किती आणि कोणते पिस्तूल वापरले याबाबत अद्यापही संभ्रम आहे.
पुणे : गुन्ह्यात वापरलेले हत्यार हे त्या घटनेची उकल करून आरोपींना शिक्षा देण्यासाठी महत्त्वाचा धागा असतो. मात्र अधंश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी नेमके किती आणि कोणते पिस्तूल वापरले याबाबत अद्यापही संभ्रम आहे. हत्येवेळी एकूण चौघे घटनास्थळी उपस्थित होते व त्यापैकी दोघांनी हत्या केली, असा दावा गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) केला आहे. मात्र त्यांनी दोन पिस्तुलाचा वापर केला की एक याबाबत अद्याप गोंधळ कायम आहे.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी एटीएसने मनिष नागोरी व विकास खंडेलवाल यांच्याकडून एक पिस्तुल जप्त केले होते. त्यानंतर २०१५साली कॉ. गोविंद पानसरे यांची हत्या झाली. कॉ. पानसरे आणि डॉ. दाभोलकर यांच्या हत्येत एकच पिस्तूल वापरण्यात आले आहे, असा दावा सीबीआयने केला होता. मात्र जप्त असलेल्या पिस्तुलातून कॉ. पानसरे यांची हत्या कशी झाली? असा प्रश्न अद्याप कायम आहे. दरम्यान या प्रकरणी अटक आरोपी सचिन अंदुरेचा मेव्हणा शुभम सुराळेचा मित्र राजेश रेगे याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलातूनच जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आल्याचा दावा सीबीआयाने केला. ते पिस्तूल बॅलेस्टीक रिपोर्टला पाठविण्यात आले असून दोन्ही गुन्ह्यात एकच पिस्तूल वापरण्यात आले का? हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे यापुर्वी नागोरी व खंडेलवाल आणि आता रेगेकडून जप्त करण्यात आलेले असे दोन पिस्तूल हत्येसाठी वापरण्यात आले हे स्पष्ट होते.
सीबीआयने नवीन थेअरी मांडल्यानंतर आणखी एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. वैभव राऊत आणि शरद कळसकर यांच्याकडे चार पिस्तूल होते. त्यांचे २३ जुलै २०१८ रोजी तुकडे करून मुंबईतील एका पुलावरुन खाडीच्या पाण्यात टाकून विल्हेवाट लावण्यात आली आहे. त्यामुळे या चारपैकीच एखादे पिस्तूल डॉ. दाभोलकर यांच्या हस्तेसाठी वापरण्यात आले होते का? तसेच ही पिस्तूले हस्तगत करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. नवनवीन थेअरी मांडून सीबीआयच या हत्येचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत असली तरी डॉ़दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी नेमकी किती पिस्तुले वापरली व कोणती याबाबत नागरिकांच्या मनात तपासाबाबत शंका उपस्थित होत आहे.
सीबीआय वेगवेगळी थिअरी घेऊन येत आहे. आरोपीला खटल्याची सुनावणी सुरू होण्यापूर्वी आपण निर्दोष असल्याचे साबित करण्यासाठी संधी नसते. याच कारणामुळे समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्यावरील कॉ. पानसरे यांच्या हत्येची सुनावणी सुरु झालेली नाही. डॉ़ दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींविरुद्ध सीबीआयकडे न्यायालयात गुन्हा साबित करता येईल, इतके भक्कम पुरावे नाहीत़
- अॅड. धर्मराज चंडेल, बचाव पक्षाचे वकील.