डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : शरद कळसकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 07:59 PM2018-09-17T19:59:06+5:302018-09-17T19:59:59+5:30
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शरद कळसकर यांची २९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पुणे : अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शरद कळसकर यांची २९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सीबीआय कोठडीची मूदत संपत असल्याने कळसकर याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांनी दिले.
दुचाकीवरून आलेल्या शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांनी डॉ. दाभोलकरांची हत्या केली. त्यांना मदत करण्यासाठी घटनास्थळी दोघेजण आधीच महर्षी शिंदे पुलावर येऊन थाबंले होते, असा दावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) शनिवारी न्यायालयात केला होता. संबंधित दोघांचा सीबीआयने तपास सुरू केला असून त्याकरिता कळसकर यांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी शनिवारी सीबीआयचे विशेष सरकारी वकील विजयकुमार ढाकणे यांनी केली केली होती. त्यानुसार कळसकर याच्या कोठडीत सोमवारपर्यंत ( १७ सप्टेंबर) वाढ करण्यात आली होती. दरम्यान कळसकर याला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयकडून करण्यात आली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण घेत न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
दरम्यान, कळसकर आणि अंदुरे दुचाकीवरून पुलावर पोहचल्यानंतर त्यांनी पुलावर असलेल्या व्यक्तींपैकी डॉ. दाभोलकर कोण आहेत हे त्यांना सांगितले. दोघांकडून डॉ. दाभोलकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर कळसकर आणि अंदुरे यांनी गोळ्या झाडल्या आहेत. वैभव राऊत आणि कळसकर यांच्याकडे चार पिस्तूल होते. पिस्तुल तोडून त्यांचे तुकडे मुंबईतील एका पुलावरुन खाडीच्या पाण्यात टाकून देत त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे, असे सीबीआयकडून न्यायालयात सांगण्यात आले आहे. कळसकर यांच्याकडे नालासोपारा येथे सापडलेल्या शस्त्रांबाबत देखील चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे त्याला मुंबईतील कारागृहात ठेवण्यात येणार आहे, असे बचाव पक्षाचे वकील अॅड. धर्मराज चंडेल यांनी सांगितले.