डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या: काळे, दिगवेकर व बंगेरा यांच्या जामिनावर आज निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 02:31 AM2018-12-14T02:31:09+5:302018-12-14T02:31:28+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा यांनी ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल झाले नाही म्हणून डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज केला आहे.
पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा यांनी ९० दिवसांत दोषारोपपत्र दाखल झाले नाही म्हणून डिफॉल्ट जामिनासाठी अर्ज केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असून आज (शुक्रवार) त्यांच्या अर्जावर निकाल होणार आहे. तिघांच्याही अटकेला ९० दिवस उलटून गेले आहे.
त्यामुळे जामीन मिळावा यासाठी बुधवारी अर्ज करण्यात आला होता. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली, अशी माहिती त्यांचे वकील अॅड. धर्मराज चंडेल यांनी दिली. चंडेल यांनी युक्तिवाद केला की, अटक केल्यानंतर आरोपींच्या विरोधात ९० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक असते. मात्र ९० दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही दोषारोपत्र दाखल न झाल्याने डिफॉल्ट जामीन देण्यात
यावा.
अर्ज दाखल होईपर्यंत केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. दरम्यान, या प्रकरणातील सीबीआयचे तपासी अधिकारी दिल्लीतील कामात व्यस्त आहेत. त्यामुळे आम्हाला २० डिसेंबरपर्यंत मुदत द्यावी, अशी मागणी सीबीआयकडून करण्यात आली आहे. याबाबत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, न्यायालय त्यावर शुक्रवारी (१४ डिसेंबर) निर्णय
देणार आहे. या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने ४५ दिवसांची मुदतवाढ दिली. ती मुदत डिसेंबरअखेरीस संपत आहे. आरोपींवर बेकायदा प्रतिबंधक हालचालीचे कलम (यूएपीए) वाढविण्यात आले आहे. या कायद्यात तपासासाठी १८० दिवस मिळण्याची तरतूद आहे.