डॉ. तात्याराव लहाने यांना नोटीस
By admin | Published: April 1, 2017 04:17 AM2017-04-01T04:17:11+5:302017-04-01T04:17:11+5:30
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी छगन भुजबळ यांना न्यायालयाची
मुंबई : राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाममंत्री व महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी छगन भुजबळ यांना न्यायालयाची परवानगी न घेताच खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी दिल्याने जे. जे रुग्णालयाचे अधिष्ठाते डॉ. तात्याराव लहाने यांना शुक्रवारी उच्च न्यायालयाने नोटीस बजावली. डॉ. लहाने यांना चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.
डिसेंबर २०१६ मध्ये काही वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी छगन भुजबळांना जे.जे.मध्ये दाखल केले असताना जे.जे. रुग्णालयाने न्यायालयाची परवानगी न घेताच त्यांना परस्पर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वास्तविक भुजबळांना अन्य रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी जे.जे.ने विशेष पीएमएलए न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक होते. त्यामुळे जानेवारी २०१७ मध्ये विशेष न्यायालयाने जे.जे.चे अधिष्ठाते डॉ. तात्याराव लहाने यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवत पुढील कारवाईसाठी हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे वर्ग केले. यावरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती. शुक्रवारच्या सुनावणीत खंडपीठाने डॉ. लहाने यांना नोटीस बजावत चार आठवड्यांत त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.
डिसेंबर-जानेवारीमध्ये भुजबळांना काही वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी त्याच चाचण्यांबाबत दुसरे मत घेण्यासाठी जे.जे. रुग्णालयाने त्यांची रवानगी बॉम्बे हॉस्पिटलला केली. मात्र त्यापूर्वी न्यायालयाकडून आदेश घेतले नाहीत. न्यायालयापुढे सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, भुजबळांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात यावे, यासाठी जे. जे. रुग्णालय आग्रही होते. (प्रतिनिधी)
अन्य आजारांवर उपचार करण्याचे आदेश नव्हते
न्यायालयाच्या आदेशााचे उल्लंघन करण्यात आले आहे. न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाला भुजबळांच्या तीन वेगवगेळ्या चाचण्या करण्याचा आदेश दिला होता.
भुजबळांना असलेल्या अन्य आजारांवर उपचार करण्याचा अधिकार रुग्णालयाला दिला नव्हता, असे म्हणत विशेष न्यायालयाने डॉ. लहाने यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले.