डॉ. राजन वेळूकर पुन्हा कुलगुरूपदी
By Admin | Published: March 7, 2015 01:59 AM2015-03-07T01:59:54+5:302015-03-07T01:59:54+5:30
मुंबई विद्यापीठाचा कारभार पुन्हा एकदा डॉ. राजन वेळूकरांकडे आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अपात्रतेचा ठपका ठेवल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी वेळूकरांना पदावरून दूर केले होते.
मुंबई : मुंबई विद्यापीठाचा कारभार पुन्हा एकदा डॉ. राजन वेळूकरांकडे आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अपात्रतेचा ठपका ठेवल्यानंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी वेळूकरांना पदावरून दूर केले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या या आदेशालाच सर्वोच्च न्यायालयात स्थगिती दिल्याने वेळूकर यांना पुन्हा एकदा विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर रुजू होण्याची सूचना राज्यपालांनी केली आहे.
डॉ. राजन वेळूकर यांनी मंगळवारी सकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या शोध समिती संदर्भातील निर्णयास २७ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर वेळूकर यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन आपली बाजू राज्यपालांपुढे ठेवली होती. मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू ए. डी. सावंत यांनी वेळूकर यांच्या निवडीला एका याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ११ डिसेंबर २०१४ रोजी या याचिकेवरील सुनावणी करताना न्यायालयाने वेळूकरांना कुलगुरूपदासाठी अपात्र ठरविले होते. तसेच
निवड समितीने वेळूकर यांची या पदावर चुकीच्या
पद्धतीने निवड केल्याचे ताशेरेही ओढले होते. या
निर्णयानंतर राज्यपालांनी वेळूकरांना कुलगुरूपदावरून
दूर केले होते. मात्र आता उच्च न्यायालयाच्या
निर्णयालाच वेळूकर यांनी सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळविल्याने राज्यपालांनी विद्यापीठाचा कारभार पुन्हा एकदा वेळूकरांकडे सोपविला. तसे पत्रकच राजभवनातून जारी करण्यात आले. (प्रतिनिधी)