डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे : ‘पायाळू देखणा’ संशोधक

By Admin | Published: July 3, 2016 02:20 AM2016-07-03T02:20:49+5:302016-07-03T02:20:49+5:30

डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्यासारख्या संशोधकांनाही त्यांच्या संशोधन क्षेत्रातील ‘गूढ’ (वाटणारी) तत्त्वे ही ‘पायाळू देखणा’ असल्याप्रमाणे सहज दिसतात आणि तितक्याच सहजपणे

Dr. Ramchandra Chintamani Dheer: 'Pudal Mana' Researcher | डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे : ‘पायाळू देखणा’ संशोधक

डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे : ‘पायाळू देखणा’ संशोधक

googlenewsNext

- तारा भवाळकर

डॉ.रा.चिं.ढेरे यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या कारकीर्दीवर दृष्टीक्षेप टाकणारा लेख.

डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्यासारख्या संशोधकांनाही त्यांच्या संशोधन क्षेत्रातील ‘गूढ’ (वाटणारी) तत्त्वे ही ‘पायाळू देखणा’ असल्याप्रमाणे सहज दिसतात आणि तितक्याच सहजपणे ते ती उलगडून दाखवतात. प्राचीन मराठी साहित्याचे आणि संस्कृतीचे संशोधक म्हणून डॉ. ढेरे महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. बऱ्याच वेळा होते काय, की एकाच क्षेत्रातील सर्व कामे एकाच शीर्षकाने ओळखली जातात. त्यातील गुणात्मक फरक, वेगळेपणा आणि वैशिष्ट्य समजून घेतले जातेच असे नाही. डॉ. ढेरे यांच्या संशोधनातील स्वतंत्र ‘देखणे’पण सांगण्याचा थोडा प्रयत्न करणार आहे.

श्री संत ज्ञानदेवांनी परिपूर्ण भक्ताची लक्षणे ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात विशद करताना विविध उपमा-उत्प्रेक्षांनी भक्तवर्णनाला पूर्णत्व दिले आहे.
पूर्ण भक्त, अव्यभिचारी भक्त अंतर्बाह्य निर्मळ असतोच. पण लौकिक प्रपंचात वावरत असतानाही भक्तीचा गूढ तत्त्वार्थ त्याला पायाळू माणसासारखा उपजत सामर्थ्याने सहज कळतो. ज्ञानदेव म्हणतात,
आंतु-बाहेरू चोखाळु।
सूर्य जैसा निर्मळु।
तत्त्वार्थींचा पायाळु।
देखणा जो ।।७९।। (अ. १२)
डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्यासारख्या संशोधकांनाही त्यांच्या संशोधन क्षेत्रातील ‘गूढ’ (वाटणारी) तत्त्वे ही ‘पायाळू देखणा’ असल्याप्रमाणे सहज दिसतात आणि तितक्याच सहजपणे ते ती उलगडून दाखवतात. प्राचीन मराठी साहित्याचे आणि संस्कृतीचे संशोधक म्हणून डॉ. ढेरे महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. बऱ्याच वेळा होते काय, की एकाच क्षेत्रातील सर्व कामे एकाच शीर्षकाने ओळखली जातात. त्यातील गुणात्मक फरक, वेगळेपणा आणि वैशिष्ट्य समजून घेतले जातेच असे नाही. डॉ. ढेरे यांच्या संशोधनातील स्वतंत्र ‘देखणे’पण सांगण्याचा थोडा प्रयत्न करणार आहे.
आधीच एक बाब स्पष्ट करणे आवश्यक आहे. ‘स्वतंत्र देखणेपण’ - स्वतंत्रपणे पाहण्याचे सामर्थ्य - म्हणजे काय? तसे तर प्रत्येक क्षेत्रातील संशोधन हे ‘मागीलांच्या’ पाऊलखुणा शोधीतच सुरू झालेले असते. त्या अर्थानेच तारतम्याने ‘स्वतंत्र’चा अर्थ संशोधनास अभिप्रेत असतो. पण या मागीलांच्या पाऊलखुणांवरून चालत असतानाच ‘देखणा’ संशोधक अचानक आपली स्वतंत्र वाट ओळखतो. ओळखतो म्हणण्यापेक्षा त्यांच्या अंतर्दृष्टीला ती गवसते. मागीलांपेक्षा ते पुढचे पाऊल असतेच. ते त्या क्षेत्रातील संशोधनाला अधिकाधिक सखोलता आणि उंचीही प्राप्त करून देणारे असते. त्या क्षेत्राच्या कक्षा व्यापक करणारे असते.
डॉ. ढेरेही याला अपवाद नाहीत. कै. वि. का राजवाडे हे डॉ. ढेरे यांचे संशोधनक्षेत्रातले आद्य आदर्श! त्याचबरोबर कै. डॉ. श्री. व्यं. केतकर, धर्मानंद आणि त्यांचे पुत्र डॉ. डी. डी. कोसांबी, कै. वासुदेवशरण अग्रवाल, कै. ह. धी. सांकलिया अशी त्यांच्यासमोरच्या पूर्वसुरींच्या आदर्शांची मालिका आहेच, पण आदर्श याचा अर्थ त्यांचे अंधानुकरण नव्हे. संशोधनाच्या क्षेत्रात अंधानुकरण आणि अंधसमर्थने सुरू झाली, की संशोधन संस्था या मठांचे रूप धारण करतात, याचे डॉ. ढेरे यांना भान आहे. त्यामुळे ‘आदर्श’ हे संशोधनक्षेत्रातील एकनिष्ठा, कष्ट आणि संशोधनात निर्माण केलेले नवनवीन प्रश्न यापुरतेच असतात. संशोधनक्षेत्रात मागीलांनी निर्माण केलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे जसे महत्त्वाचे असते, तसेच नवीन प्रश्न निर्माण होतात आणि जे पुढील संशोधकांना आव्हाने देत राहतात, तेच ज्ञानक्षेत्र खऱ्या अर्थाने समृद्ध होत असते, हे डॉ. ढेरे यांच्या संशोधनाचे गृहीतक आहे. वस्तुत: लोकसंस्कृतीच्या अध्ययनासाठी डॉ. ढेरे यांना जी साधने महत्त्वाची वाटतात, ती कै. राजवाडे यांना मुळीच महत्त्वाची वाटत नव्हती; पण दुर्लक्ष करण्याजोगीही वाटत नव्हती. ‘भ्रांत साधने’ म्हणून त्यांनी त्याची काहीशी उपेक्षा केली होती. पण उपेक्षा केली असली, तरी त्या त्या वेळी प्रसंगपरत्वे त्यावर त्यांनी लेखनही केले आहे. उदाहरणार्थ लोकप्रचलित चाली-रीती, रूढी, लोकसमज, फार काय लोकप्रचलित जादू-टोण्याचे मंत्र-तंत्र यांच्यावरही राजवाड्यांनी टिपणे लिहिली आहेत. लहान-लहान असंख्य नोंदी त्यांनी करून ठेवल्या आहेत. डॉ. ढेरे यांनी त्या सर्वांचे महत्त्व ‘देखणे’ पणाने जाणले आणि त्या ‘भ्रांत’ समजल्या गेलेल्या साधनांचे सामर्थ्य समजून त्या आधारे, आपले संशोधन सकस आणि समृद्ध केले आहे. चिकित्सेच्या बाबतीत चोख असलेले त्यांचे प्रतिपादन शब्दरुप घेताना मात्र कमालीचे हळुवार होते. कारण प्राचीन, मध्ययुगीन साहित्याचे संशोधन म्हणजे ते साहित्य ज्या समूहमनाचा आविष्कार आहे, त्या समूहमनाचे विश्लेषण असते.
हे समूहमन विविध भावबंध जतन करणारे असते. त्या भावबंधांची गुंतागुंत सोडवणे म्हणजे विविध रंगांच्या रेशीम धाग्यांची गुंतवळ सोडवण्याइतके नाजूक, चिकाटीचे आणि सहृदयतेचे काम आहे. त्या गुंत्यांची उकल करताना हळुवार हातांची गरज असते. डॉ. ढेरे यांची शब्दकळा हे काम करते. आजच्या भाषेत सांगायचे तर डॉ. ढेरे यांचे संशोधन ‘राष्ट्रीय एकात्मतेला पोषक’ आहेच, पण विज्ञानयुगाला आवश्यक अशा अखिल मानवजातीला एकत्र आणणाऱ्या विश्वैक्य भावनेचे
डोळस पोषण करणारे आहे.

(पूर्वप्रकाशित लेखाचा संपादित अंश)

Web Title: Dr. Ramchandra Chintamani Dheer: 'Pudal Mana' Researcher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.