HMPVमुळे भारतात पुन्हा महामारी? लहान मुलांना किती धोका? डॉ. रवी गोडसे म्हणाले, २०२७पर्यंत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 13:42 IST2025-01-06T13:41:23+5:302025-01-06T13:42:18+5:30

HMPV Virus News: चीनमधील HMPV व्हायरस मलेशिया, हाँगकाँग देशात परसत असून, भारतातही याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.

dr ravi godse first reaction over hmpv virus is the causes another epidemic in india and how much risk to young children | HMPVमुळे भारतात पुन्हा महामारी? लहान मुलांना किती धोका? डॉ. रवी गोडसे म्हणाले, २०२७पर्यंत...

HMPVमुळे भारतात पुन्हा महामारी? लहान मुलांना किती धोका? डॉ. रवी गोडसे म्हणाले, २०२७पर्यंत...

HMPV Virus News: कोरोनाच्या कटू आठवणी आताशा कुठे मनाच्या पटलावरून पुसल्या जात असतानाच चीनमधूनच पुन्हा एक व्हायरस जगाच्या दिशेने फैलावत आहे. २०२० मध्ये जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडला आहे. कोरोना महामारीच्या जवळपास ५ वर्षांनंतर चीनला एका नव्या आरोग्य संकटाचा सामना करावा लागत आहे. यावेळी ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) चीनमध्ये वेगाने पसरू लागला आहे. या व्हायरसची प्रकरणे केवळ चीनमध्येच नाही तर शेजारील देशांमध्येही नोंदवली जात आहेत. चीनमधील हा व्हायरस भारतातही पोहोचला आहे. या व्हायरसचा पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये आढळला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बंगळुरू येथील एका रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीमध्ये HMPV व्हायरस आढळून आला आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाने म्हटले आहे की, आम्ही आमच्या लॅबमध्ये याची चाचणी केलेली नाही. मात्र, या प्रकरणाचा अहवाल एका खासगी रुग्णालयात आला आहे. खासगी रुग्णालयाच्या या अहवालावर शंका घेण्याचे कारण नाही. दुसरीकडे मलेशियामध्ये एचएमपीव्ही व्हायरसचे काही रुग्ण समोर आल्यानंतर सरकारने तातडीने खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. चीनच्या शेजारील देश हाँगकाँगमध्येही एचएमपीव्हीचे रुग्ण नोंदवले गेले आहेत.

HMPVमुळे लहान मुलांना किती धोका? डॉ. रवी गोडसे म्हणाले...

एचएमपीव्ही व्हायरसमुळे भारताला फारसा धोका नाही, असे डॉ. रवी गोडसे यांनी स्पष्ट केले. भारतीयांना काळजी करण्याची गरज नाही. सध्या चीनमधील लोक मास्क घालून फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. मात्र, चीनमध्ये प्रदूषणाची समस्या असल्याने तेथील लोक नेहमीच मास्क घालून फिरतात. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. एचएमपीव्ही व्हायरस हा अत्यंत साधा आहे. तो अगदी कमी किंवा खूप जास्त वय असलेल्या व्यक्तींना होतो. विशेषत: लहान बालकांना एचएमपीव्ही व्हायरसची लागण होण्याची धोका असतो. मात्र, यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता खूपच दुर्मिळ आहे, असे डॉ. रवी गोडसे यांनी सांगितले. 

या मुलांना HMPV व्हायरस झाल्यानंतर ती लगेच बरी न होता...

चीनमध्ये कोरोनाच्या काळात झिरो कोव्हिड पॉलिसी होती. या काळात जी लहान मुले जन्माला आली, ती फारशी घराबाहेर पडली नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ही मुले घरातच बसून  होती. मुलं जन्माला आल्यानंतर सहा महिने आईचे दूध पितात. हे दूध बंद झाल्यानंतर पुढील सहा महिने मुलांसाठी महत्त्वाचे असतात. या काळात लहान मुलं आजारांचा सामना कसा करावा, हे शिकतात. त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. मात्र, चीनमधील मुलं गेल्या दोन-तीन वर्षांपासून घराबाहेर न पडल्यामुळेच त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती विकसित झालेली नाही. त्यामुळे या मुलांना HMPV व्हायरस झाल्यानंतर ती लगेच बरी न होता, त्यांना गंभीर आजार होत आहेत, असे निरीक्षण डॉ. रवी गोडसे यांनी मांडले.

२०२७ पर्यंत HMPV व्हायरस जगातून निघून जाईल

भारतात कोरोनाच्या काळात चीनइतका कठोर लॉकडाऊन नव्हता. त्यामुळे आपल्याकडील लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती शाबूत राहिली आहे. त्यामुळे हा व्हायरस भारतात फार पसरणार नाही. चीनमध्ये लहान बालकांना HMPV व्हायरसची लागण होत आहे. त्यांच्याकडून पालकांना संक्रमण होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे ही लहान मुले कुठेही प्रवास करण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे HMPV व्हायरस जगभरात पसरण्याची शक्यता नाही. २०२७ पर्यंत HMPV व्हायरस जगातून निघून जाईल. आपोआप या व्हायरसचे उच्चाटन होईल, असा दावा डॉ. रवी गोडसे यांनी केला. ते एबीपी माझाशी बोलत होते. 

हा व्हायरस नवीन नाही, घाबरू नका  

HMPV व्हायरस नवीन नाही, घाबरू नका, असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे (महाराष्ट्र) माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी नागरिकांना केले आहे. तसेच, श्वसनसंस्थेच्या या आजारात सर्दी, खोकला, ताप येतो, तो शिंका- खोकल्यातूनच पसरतो. पण कोरोना इतका तो घातक नाही. २००१ मध्येच त्याला विलग करून त्याचा अभ्यास झालेला आहे. चीन, जपान, अमेरिका, कॅनडामध्ये याचे रुग्ण पूर्वीपासून आढळत आहेत. भारतात याने बाधित रुग्ण आढळले नाहीत, असेही  डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

दरम्यान, ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. त्याच्या संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो आणि हिवाळ्यामध्ये हे सर्वांत सामान्य आहे.

 

Web Title: dr ravi godse first reaction over hmpv virus is the causes another epidemic in india and how much risk to young children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.