CoronaVirus: ...तर कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; टास्क फोर्स प्रमुखांकडून खबरदारीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 09:10 AM2021-05-07T09:10:12+5:302021-05-07T09:12:10+5:30
CoronaVirus: कोरोनावर उपचार घेतल्यानंतर अनेकांमध्ये काळ्या बुरशीचा आजार आढळून आल्याचे पाहायला मिळत आहे. डॉ. संजय ओक यांनी यामागील कारणांचा उहापोह करत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली आहे. त्यातच आता, विदर्भ आणि मराठवाडा या भागातील कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये काळी बुरशीचा प्रादुर्भाव वाढताना पाहायला मिळत आहे. यासंदर्भात लोकमतशी बोलताना राज्यातील टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सविस्तर माहिती दिली. कोरोना रुग्णावर उपचार करताना स्टेरॉइडचा अधिकचा वापर काळ्या बुरशीच्या आजारासाठी कारणीभूत ठरू शकतो, असे मत डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केले. (dr sanjay oak told about black fungus in corona patients)
लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी डॉ. संजय ओक यांच्याशी साधलेल्या संवादावेळी विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा येथील कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये काळ्या बुरशीचा आजार वाढताना दिसत असल्याविषयी प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना डॉ. ओक म्हणाले की, मेडिकलच्या भाषेत काळ्या बुरशीला म्युकोरमायकोसीस असे म्हटले जाते. हा आजार रेअर असून, हा तीव्र बुरशीचा आजार आहे. गेल्या तीन दशकांमध्ये अशा प्रकारचा आजार सामान्यपणे आढळून आलेला नव्हता. मात्र, गेल्या दीड वर्षात काळ्या बुरशीचे प्रमाण वाढताना पाहायला मिळत आहे, असे डॉ. ओक यांनी स्पष्ट केले.
काळ्या बुरशीचे परिणाम अत्यंत धोकादायक
काळी बुरशी किंवा काळ्या बुरशीचा आजार हा डोळ्यांजवळ, तसेच गालावरील हाड येथे बहुतांश केसेसमध्ये आढळतो. हा आजार इतका तीव्र असतो की, प्रसंगी दृष्टी जाऊ शकते, डोळाही काढावा लागू शकतो. गालावरील हाडाजवळ हा रोग झाल्यास तो भाग काढून टाकावा लागू शकतो. तोंडाजवळ झाल्यास जबडा काढून टाकावा लागू शकतो, इतक्या भयंकर परिणाम काळ्या बुरशीचा होऊ शकतो. किंबहुना शेवटी मृत्यूही होऊ शकतो, असे डॉ. ओक यांनी नमूद केले. काळ्या बुरशीचा आजार हे अत्यंत पुढचे टोक आहे. मात्र, बहुतांश कोरोनाचा उपचार घेतलेल्यांमध्ये कँडिडा बुरशी किंवा तत्सम प्रकारच्या बुरशीची सूक्ष्म लक्षणे आढळून आलेली आहेत. विशेषतः जननेंद्रियांच्या बाजूला होणारी फंगल इन्फेक्शन्स आढळून आलेली आहेत, असेही डॉ. ओक म्हणाले.
अशा प्रकारचा आजार होण्यामागील कारणे
कोरोनावर उपचार घेतल्यानंतर अशा प्रकारचे फंगल इन्फेक्शन्स किंवा असा आजार होण्यामागे दोन ते तीन कारणे आहेत. अनियंत्रित मधुमेह असणाऱ्या लोकांमध्ये हा आजार दिसून येतो. कोरोनाच्या आजारात ९ दिवसांपेक्षा अधिक काळ स्टेरॉइड दिली गेली असतील. स्टेरॉइड डोसचे प्रमाण अतिशय मोठ्या स्वरुपात असेल, तर अशा प्रकारचा आजार बळावू शकतो, असे डॉ. ओक यांनी नमूद केले.
गावोगावच्या डॉक्टरांशी बैठका घेतल्या
कोरोनावर उपचार करण्याची विशिष्ट पद्धत कशी फॉलो करायची, यासंदर्भात गावोगावच्या डॉक्टरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून असंख्यवेळा बैठका घेण्यात आल्या आहेत. अनेकदा स्टेरॉइडबाबत डॉक्टरांच्या मनात आस्था असल्याचे दिसून येते. त्यामुळे याचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याचे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. स्टेरॉइड हे दुधारी शस्त्र आहे. ते वापरण्याचे तारतम्य डॉक्टरांनी बाळगायला हवे, असा सल्ला यावेळी डॉ. ओक यांनी दिला. दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर प्रचंड तणावाखाली आहेत. नातेवाइक आणि अन्य मंडळी यांचा अनेकदा अमूक एखादे औषध देण्याविषयी आग्रह असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रेमडेसिवीर. अनेकदा डॉक्टर रेमडेसिवीर देऊ इच्छित नाहीत. परंतु, नातेवाइकांकडून ते देण्याबाबत दबाव आणला जातो, असेही प्रकार आढळून आल्याचे डॉ. ओक यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.