कोरोनाकाळात शीतल आमटे यांनी कोविड योद्धा म्हणून केलं होतं काम
By बाळकृष्ण परब | Published: November 30, 2020 04:10 PM2020-11-30T16:10:40+5:302020-11-30T16:17:51+5:30
Dr Sheetal Amte Suicide : आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई - दिवंगत समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि आनंदवन येथील महारोगी सेवा समिती सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोनाकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शीतल आमटे करजगी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा दिली होती.
''वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी आनंदवनात पूर्णवेळ आरोग्याशी संबंधित काम करत होते. चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गास सुरुवात झाल्यानंतर आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो. सरकारने लॉकडाऊन करण्यापूर्वीच आम्ही आनंदवनात खबरदारी घेण्यास सुरुवात केली होती. जेव्हा मला कोविड योद्धा योजनेबाबत समजले तेव्हा मी या योजनेमध्ये सहभाग घेण्याचे ठरवले. त्यानंतर मी ऑनलाइन प्रशिक्षण घेऊन या सेवेत रुजू झाले,'' अशी प्रतिक्रिया शीतल आमटे-करजगी यांनी त्यावेळी दिली होती.
दरम्यान, डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली होती. स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेतल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकारी सूत्रांनी दिली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप पुढे आले नाही. शीतल करजगी आमटे या डॉ. बाबा आमटे यांची नात तर डॉ. विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या. गौतम करजगी हे महारोगी सेवा समितीच्या विश्वस्त मंडळावर आहेत. शीतल या ३९ वर्षांच्या होत्या. त्यांना शर्विल नावाचा सहा वर्षांचा मुलगा आहे.
हायप्रोफाईल केस असल्याने उत्तरीय तपासणीसाठी डॉ शीतल आमटे-करजगी यांचा मृतदेह वरोरा उपजिल्हा रुग्णालयातून चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविला.
आनंदवन येथील घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे व वरोरा ठाणेदार दीपक खोब्रागडे पोलीस ताफ्यासह दाखल झाले असून त्यांच्या घराची तपासणी सुरू केली आहे. डॉ. शीतल आमटे-करजगी यांचे वडील विकास आमटे, आई मंदाकिनी आमटे व भाऊ कौस्तुभ आमटे व त्यांची पत्नी हेमलकसा येथे काही दिवसांपासून रहायला गेले होते.