डॉ. किरवले यांच्या हत्येच्या निषेधार्थ कोल्हापुरात ठिय्या आंदोलन
By admin | Published: March 4, 2017 02:46 PM2017-03-04T14:46:49+5:302017-03-04T14:46:49+5:30
डॉ. कृष्णा किरवले यांच्या हत्येच्या निषेधार्थ सीपीआरमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले.
Next
ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 4 - आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, ज्येष्ठ साहित्यिक व शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख डॉ. कृष्णा रामभाऊ किरवले यांची शुक्रवारी राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ दलित नेते, कार्यकर्त्यांनी सीपीआरमध्ये ठिय्या आंदोलन केले.
जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत किरवले यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक भूमिका घेत आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस प्रशासनाविरोधातही निदर्शनं करण्यात आली. दरम्यान, लातूरमधील टाऊन हॉलवरही किरवले यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंबेडकरवादी कार्यकर्त्यांकडून निदर्शनं करण्यात आली.
फर्निचरच्या कामाचे 25 हजार रुपये वेळेत न दिल्याच्या रागातून ही किरवले यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले असून, पोलिसांनी प्रीतम गणपती पाटील (३०) यास अटक केली आहे. त्याच्या आई-वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
किरवले यांच्या हत्येमुळे दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. हा खून दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी या मालिकेतील असून त्यामागे हिंदुत्ववाद्यांचे षड्यंत्र असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्या दिशेने पोलिसांनी तपास करावा, असा त्यांनी आग्रह धरला. त्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना घेरावही घातला; परंतु हत्येचे कारण व संशयित आरोपीस अटक केल्याचे समजल्यावर हे कार्यकर्ते शांत झाले. आरोपीचा मित्र विजयसिंह मोहनसिंह राजपूत (३४) याच्या तक्रारीवरून राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.