डॉ. खोलेंची तक्रार घेणा-या पोलिसाला निलंबित करा; मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित करण्याचा कुटील डाव : जितेंद्र आव्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 08:53 AM2017-09-10T08:53:08+5:302017-09-10T08:54:02+5:30
संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. समानता मोडीत काढून मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित करण्याचा कुटील डाव आहे.आज स्वयंपाकबंदी केली, उद्या मंदिरात जाण्यास बंदी घातली जाईल. पाणी पिण्यास बंदी घातली जाईल
ठाणे, दि. 10 - पुरोगामी महाराष्ट्रात सोवळे सोडून स्वयंपाक केला, म्हणून एका बहुजन समाजातील स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल करणा-या डॉ. मेधा खोले आणि त्यांचा गुन्हा दाखल करून घेणारा पोलीस अधिकारी यांना निलंबित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
अलीकडेच झालेल्या पावसात लोकांनी एकमेकांना हात देऊन जीव वाचवले. त्या वेळी कुणालाही कुठेच जात दिसली नव्हती. त्या वेळी फक्त ‘माणुसकी’ ही एकच जात दिसली होती. मात्र, खोले यांनी जातीपातीची मूळे किती खोलवर रुजलेली आहेत, हेच दाखवून दिले आहे. पाच वेळा या महिलेने केलेले जेवण आवडल्यानंतर यादव नावाच्या महिलेला नोकरीवर ठेवले होते. आता अचानक निर्मला हिची जात उघडकीस आल्याने खोले यांचा धर्म भ्रष्ट झाला, यावरून विशिष्ट लोकांच्या मनात जात किती घट्ट रुजलेली आहे, हेच दिसते. जे कालपर्यंत जात मानत नाही, असे बोलत होते, ते आता सोवळे सोडल्याचा कांगावा करून जर गुन्हा दाखल करत असतील, तर ते सहन केले जाणार नाही. तसेच ज्या मूर्ख पोलीस अधिका-याने हा गुन्हा दाखल केला, त्याची ओळख सबंध महाराष्ट्राला होणे गरजेचे आहे. म्हणून, त्याला आता तातडीने निलंबित करण्यात आले पाहिजे, असे आ. आव्हाड यांनी म्हटले आहे.
आज स्वयंपाकबंदी केली, उद्या मंदिरात जाण्यास बंदी घातली जाईल. पाणी पिण्यास बंदी घातली जाईल, असे आव्हाड पुढे म्हणाले.
‘...तर गंभीर परिणाम’
संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. समानता मोडीत काढून मनुस्मृतीचे राज्य प्रस्थापित करण्याचा कुटील डाव आहे. संविधानाला जर हात लावला, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही आ. आव्हाड यांनी दिला.