आपल्याला भाजप सरकारचा नाही तर एका मंत्र्याचा त्रास होता - डॉ. लहाने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 09:51 PM2021-02-02T21:51:28+5:302021-02-02T21:54:55+5:30
भाजप सरकारच्या काळात आपल्याला तत्कालीन एका मंत्र्याचा त्रास होता. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली, अशी माहिती डॉ. तात्याराव लहाने यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजप सरकारच्या काळात आपल्याला तत्कालीन एका मंत्र्याचा त्रास होता. त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली, अशी माहिती डॉ. तात्याराव लहाने यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
वंजारवाडी या गावात डॉ. एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्या ठिकाणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. मुंडे यांनी आपल्याला विरोधी पक्ष नेते असताना केलेली मदत लहाने यांनी आपल्या भाषणातून सांगितली. भाजप सरकारच्या काळातील एका मंत्र्यांनी आपल्याला त्रास दिला, मात्र आपण देवेंद्र फडणवीस यांच्या समोर वस्तुस्थिती मांडल्यानंतर त्यांनी आपली आपल्याला पूर्ण सहकार्य केले. शिवाय राज्यातून मोतीबिंदू उच्चाटन करण्याच्या मोहिमेचे प्रमुखही केले. कालांतराने त्यांनी मंत्रीमंडळात बदल करून गिरीश महाजन यांना वैद्यकीय शिक्षणमंत्री केले.
"तात्याराव लहाने यांच्याकडून 'त्या' वक्तव्याची अपेक्षा नव्हती; त्यांनी चार भिंतीत बोलायला हवे होते"
ज्यावेळी मला त्रास दिला गेला, त्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते या नात्याने धनंजय मुंडे यांनी आपला विषय विधान परिषदेतही मांडला. माध्यमांनी आपली बाजू जनतेसमोर आणली. 'लोकमत'ने त्यावेळी आपल्यावर लिहिलेल्या लेखाचा देखील डॉक्टर लहाने यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, गिरीश महाजन यांनी देखील आपल्याला वैद्यकीय मंत्री म्हणून कायम पाठिंबा दिला. वेगवेगळ्या शिबिरांसाठी सहकार्य केले. ही सर्व माहिती आपण त्या कार्यक्रमात सांगितली. मात्र, याच्या बातम्या काही ठिकाणी विपर्यस्त आल्या, असे सांगून डॉक्टर लहाने म्हणाले एका मंत्र्याने दिलेला त्रास असताना, भाजप सरकारने आपल्याला त्रास दिला, अशा स्वरूपाच्या बातम्या दिल्या गेल्या, पण वस्तुस्थिती तशी नव्हती.