नाले साफ नाहीच...मुंबई तुंबणार
By admin | Published: May 31, 2016 03:34 AM2016-05-31T03:34:01+5:302016-05-31T03:34:01+5:30
मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी प्रामुख्याने नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण करण्यासाठी शेवटचे २४ तास उरले आहेत़ गेल्या वर्षी नाल्यांच्या सफाईत भ्रष्टाचार झाल्याचे उजेडात आले़ याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर
शेफाली परब-पंडित, मुंबई
मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी प्रामुख्याने नाल्यांच्या सफाईचे काम पूर्ण करण्यासाठी शेवटचे २४ तास उरले आहेत़ गेल्या वर्षी नाल्यांच्या सफाईत भ्रष्टाचार झाल्याचे उजेडात आले़ याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर यंदातरी ठेकेदार नालेसफाईची कामे चोख बजावतील, अशी खबरदारी महापालिकेने घेणे अपेक्षित होते़ मात्र ‘लोकमत’ने गेल्या पाच दिवसांमध्ये या कामांचा पंचनामा केला असता परिस्थिती जैसे थेच असल्याचे दिसून आले़ या मालिकेची दखल घेऊन सत्ताधारी व विरोधी पक्षांनीही प्रशासनाला जाब विचारला़ पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये एकमत झाले आहे, ते म्हणजे यंदा नाले भरून मुंबईची ‘तुंबापुरी’ होणार यावऱ मात्र या वेळेस विरोधकांबरोबरच सत्तेतील मित्रपक्ष भाजपानेही शिवसेनेवर शरसंधान केले आहे़
नाल्यांमधून वर्षभर टप्प्याटप्प्याने गाळ काढण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे़ मात्र या निर्णयाचा पहिल्याच वर्षी बाजा वाजला आहे़ जानेवारी महिन्यात नाल्यांच्या सफाईला सुरुवात होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात गाळ काढण्याच्या कामाला एप्रिलनंतर वेग आला़ यात ठेकेदार मिळत नसल्याने छोट्या नाल्यांची सफाई विभागस्तरावर सुरू आहे़ मात्र नाल्यांतून काढलेला गाळ टाकायचा कुठे या विवंचनेतच महिना उलटला़ ठेकेदार मुंबईबाहेरील कचराभूमीची बनावट ना हरकत प्रमाणपत्रे आणत असल्याने या वेळी पालिकेनेच नऊ जागा शोधून काढल्या आहेत़ नाल्यांमधून काढलेला गाळ या भूखंडांवर टाकण्यात येतो आहे का, याची खातरजमा करण्यासाठी स्थायी समितीची उप समितीही नेमली आहे़
मात्र हे शहाणपण पालिकेला सुचेपर्यंत महत्त्वाचा वेळ वाया गेला़ त्यामुळे कचरा, डेब्रिज, प्लॅस्टिकने भरलेले नाले मुंबईला यंदाच्या पावसाळ्यात जलमय करण्यासाठी सज्ज आहेत़ दरवर्षी नालेसफाईचे पाहणी दौरे म्हणजे राजकीय जत्राच असते़ यंदादेखील याहून वेगळी परिस्थिती नाही़ पुढचे वर्ष निवडणुकीचे असल्याने राजकीय चिखलफेक रंगात आली आहे़ मात्र या वेळेस मित्रपक्षानेही साथ सोडल्यामुळे सत्तेवर असूनही शिवसेना एकटी पडली आहे़ काँग्रेस नालेसफाईचे बिंग फोडण्याच्या तयारीत आहे; तर राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपा नेत्यांच्या घरासमोर गाळ टाकण्याचा इशारा दिला आहे़ मित्रपक्ष भाजपाने यापुढे जाऊन नालेसफाईचे १२ वाजण्यास शिवसेनेलाच जबाबदार धरले आहे़ त्यामुळे शिवसेनेनेही नालेसफाई अपूर्ण असल्याची सावध भूमिका घेतली आहे़
शिवसेनाही म्हणते,
नाले साफ नाहीच!
नाल्यांची सफाई ज्या पद्धतीने होणे अपेक्षित आहे तशी झालेली नाही़ धारावी अंतर्गत छोटे नाले विभागस्तरावर साफ होणे अपेक्षित आहे़ याबाबत अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे़ त्यांनी विभाग अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आहे़ माझ्या वॉर्डातील किस्मतनगर नाला साफ झालेला नाही़ नालेसफाईची काही कामे अद्याप बाकी आहेत़
- तृष्णा विश्वासराव
(सभागृह नेत्या) शिवसेना
प्रशासन व सत्ताधारी नापास
नाल्यांची सफाई झालेलीच नाही़ ‘लोकमत’ने केलेला पंचनामा बरोबर आहे़ धारावीतील नाल्यांची सफाई झालेलीच नाही़ हे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे अपयश असून, पावसाळ्यात मुंबई तुंबणाऱ
- संदीप देशपांडे (गटनेते, मनसे)
शिवसेनाच जबाबदार
मुंबईमध्ये नाल्यांच्या सफाईला सुरुवात तर झाली़ पण नाले साफ झालेले नाहीत़ नालेसफाईची कामे मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहेत़ नाल्यांची सफाई केवळ कागदोपत्री झाली आहे़ त्यामुळे मुंबईत पाणी भरणाऱ यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच शिवसेनाही जबाबदार आहे़ नालेसफाईतील भ्रष्टाचाराविरोधात भाजपानेच सर्वप्रथम आवाज उठविला होता़ आम्ही सत्तेत सहभागी पक्ष आहोत; पण सत्ताधारी शिवसेनाच असल्याने तेच या अपयशासाठी कारणीभूत आहेत़
- भालचंद्र शिरसाट (भाजपा प्रवक्ते)करून नाही,
नाले भरून दाखविले
पावसाळ्याच्या एक महिन्याआधीच नाले साफ होतील, असा दावा प्रशासनाने केला होता़ आपले कार्यकर्ते रस्त्यावर उतरून भरलेल्या नाल्यांची सफाई करून घेतील, अशी घोषणाबाजी करणाऱ्या शिवसेनेने करून नाही, नाले भरून दाखविले़ तुंबलेले नाल्यांचे सत्य ‘लोकमत’ने लोकांसमोर आणले़ जे काम एका वृत्तपत्राने केले, ते सत्ताधारी व अधिकाऱ्यांना का जमले नाही? शिवसेना-भाजपा युतीच्या निष्क्रिय कारभारामुळे मुंबई यंदा तुंबणाऱ
- प्रवीण छेडा (विरोधी पक्षनेते)कुरघोडीच्या
राजकारणाचा फटका
‘लोकमत’ने केलेला पंचनामा हे नालेसफाईचे वास्तव आहे़ नाल्यांची सफाई अजिबात झालेली नाही़ शिवसेना-भाजपा युतीमधील कुरघोडीचा फटका नाहक मुंबईकरांना बसणार आहे़ नालेसफाईसाठी खर्च केलेले सव्वाशे कोटी रुपये पाण्यात जाण्याची चिन्हे आहेत़ यंदाच्या पावसाळ्यात मुंबई तुंबणार यात शंकाच नाही़ मात्र तसे झाल्यास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाल्यांमधील गाळ काढून शिवसेना-भाजपा नेत्यांच्या कार्यालयासमोर व घरासमोर टाकतील़
-धनंजय पिसाळ (गटनेते,राष्ट्रवादी काँग्रेस)