नाले अडकले गाळात
By admin | Published: May 30, 2016 01:58 AM2016-05-30T01:58:22+5:302016-05-30T01:58:22+5:30
नाल्यांवरील झोपड्यांचे पुनर्वसन, नदी व नाल्यांचे रुंदीकरण, संरक्षण भिंत बांधणे अशी कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे़
मुंबई : मान्सूनपूर्व कामांची मुदत संपण्यास अवघे ४८ तास उरले आहेत़ नाल्यांची सफाई, गाळाची विल्हेवाट, नाल्यांवरील झोपड्यांचे पुनर्वसन, नदी व नाल्यांचे रुंदीकरण, संरक्षण भिंत बांधणे अशी कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे़ मात्र पश्चिम व पूर्व उपनगरांपाठोपाठ शहर भागातील नाल्यांचीही थोड्याफार फरकाने तीच स्थिती असल्याचे दिसून येत आहे़
>वडाळ्यात डास आणि दुर्गंधी
कोरबा मिठागर येथील सर्व नाल्यांमधील गाळ काढल्यानंतरही त्याची विल्हेवाट लावण्याचे काम धिम्या गतीने सुरूआहे़ नाल्याच्या तोंडावरच गाळ पडून असल्याने हा गाळ पावसाळ्यात पुन्हा नाल्यात वाहून जाण्याचा धोका आहे़ नाल्यातील गाळाच्या दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवाशांना नाक मुठीत घेऊन राहावे लागते़ गाळामुळे डास वाढले आहेत. त्यामुळे आरोग्यही धोक्यात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे़ वडाळा पूर्व येथील आदर्श रमाई नालाही कचऱ्याने भरलेला असतो़ त्यामुळे पावसाळ्यात भरतीच्या वेळी आसपासच्या परिसरात पाणी तुंबण्याची दाट शक्यता आहे़, तर पारधीनगर नाल्याची हीच अवस्था आहे़
>धारावीतील
नाले तुंबलेले
विभागांतर्गत नालेसफाईचे तीनतेरा वाजले आहेत़ धारावी विभागांतर्गत नाले आजही गाळाने भरलेले आहेत़ धारावी क्रॉस रोडवरील अनेक वस्त्यांचे सांडपाणी या नाल्यात सोडले जाते़ त्यामुळे येथे कचरा साचलेला असतो़ परिणामी, नाल्यातील सांडपाणी वाहून जात नाही़ दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव हा त्रास येथेही आहे़
>माटुंगा लेबर कॅम्प
दादर-माटुंगा-माहीमहून धारावी खाडीला जोडण्यात आलेला नाला कचऱ्याने भरलेला असतो़ माटुंगा लेबर कॅम्प नाल्यामध्ये सफाईनंतरही कचरा दिसून येतो़ त्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याची भीती आहे़ या नाल्याच्या सफाईचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर रखडला होता़ तसेच जी उत्तर व जी दक्षिण या प्रभागात हा प्रस्ताव रखडल्यामुळे या कामाला विलंबच झाला़
>नाले उपनगरांतील असो अथवा शहरातील,सर्व ठिकाणी एकच समस्या प्रामुख्याने दिसून आली आहे़ नाल्यांची सफाई केल्यानंतरही स्थानिक रहिवासी नाल्यात कचरा टाकतात़ त्यामुळे नाला पुन्हा प्लॅस्टिक, बांधकामाचे
साहित्य अशा टाकाऊ वस्तंूनी भरून जातो़
कुर्ला येथील श्रमजीवी नाला, मालाड येथील कुरार व्हिलेज आणि मालवणी नाला, गोवंडी येथील रफिकनगर नाला, अंधेरीचा मोगरा नाला, वांद्रे येथील बेहरामपाडा आणि एअरपोर्ट नाल्यांमध्ये स्थानिक रहिवासी कचरा टाकत असल्याचे पालिकेला दिसून आले आहे़
घनकचरा व्यवस्थापन विभागाने काही वर्षांपूर्वी नाल्यांच्या परिसरातील झोपडपट्टींसाठी कचऱ्याचे डबे बसविण्याची शिफारस केली होती़ या डब्यात नागरिकांनी कचरा टाकल्यास नाला साफ राहील, असा दावा या विभागाने केला होता़
मात्र हा पर्याय प्रशासनाने अमान्य केला़ वारंवार ताकीद देऊनही रहिवासी पालिकेला जुमानत नसल्याने अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे़ त्यानुसार नाल्यात कचरा टाकणाऱ्यांकडून २०० ते १००० रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येणार आहे़