मराठा आरक्षणावरून भाजपा कार्यकारिणीत नाट्य
By admin | Published: October 7, 2016 05:31 AM2016-10-07T05:31:45+5:302016-10-07T05:31:45+5:30
भाजपा कार्यसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षणावर ठराव मांडण्यावरून बरेच नाट्य् रंगले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे मराठा आरक्षणाबाबतचा ठराव मांडणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत होते
मुंबई : भाजपा कार्यसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षणावर ठराव मांडण्यावरून बरेच नाट्य् रंगले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे मराठा आरक्षणाबाबतचा ठराव मांडणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत होते. मात्र, पंकजा यांनी बैठकीलाच दांडी मारल्याने ऐनवेळी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना हा ठराव मांडावा लागला.
भाजपा कार्यसमितीची दोन दिवशीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणाचा ठराव मांडला गेला. मात्र, ठरावाचा मसुदा अत्यंत मोघम ठेवण्यात आला. या ठरावात मराठा समाजास शिक्षण व नोकरीत १६ टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, त्याचबरोबर हे आरक्षण ओबीसींच्या विद्यमान आरक्षणाहून वेगळे असायला हवे व अनुसूचित जाती आणि जमातींसाठी असलेल्या आरक्षणासही त्यामुळे धक्का लागता कामा नये, असे त्यात नमूद केले आहे. शिवाय, आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घातलेले बंधनही (कमाल ५० टक्के) पाळले जावे, असे हा ठराव म्हणतो.
मराठा आरक्षणाचा ठराव मांडण्यावरूनही बैठकीत राजकीय नाट्य रंगले. हा ठराव मंत्री पंकजा मुंडे मांडणार असल्याचे सांगण्यात आले होते, पण त्यांनी नेमक्या वेळी बैठकीकडे पाठ फिरवल्याने ऐन वेळी हा ठराव मांडण्याची जबाबदारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आली. ओबीसींच्या नेत्या अशी पंकजा यांची ओळख सर्वश्रुत आहे.
कार्यसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षणासह राजकीय आणि शेतीविषयक ठराव संमत करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांना दिली. राज्यात मुस्लीम आरक्षणाची मागणी जोर धरत असून, मोर्चांची तयारी सुरू आहे. त्यामुळे मुस्लीम आरक्षणाला पाठिंबा देणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर काहीसे नाराज झालेल्या दानवे यांनी धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्ट केले.
मराठा समाजाच्या आजच्या स्थितीला १५ वर्षे सत्तेत असणारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जबाबदार आहे. हे मागासलेपण दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते, तर प्रश्न निर्माण झाले नसते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आघाडीच्या नेत्यांना जाग आली. भाजपा मात्र, मराठा आरक्षणाला कटिबद्ध आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविला जाईल, असे दानवे यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)