रंगारंग कार्यक्रमांनी रंगणार नाट्यसंमेलन!
By admin | Published: April 20, 2017 03:13 AM2017-04-20T03:13:52+5:302017-04-20T03:13:52+5:30
उस्मानाबाद येथे २१ ते २३ एप्रिल या कालावधीत रंगणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात, तमाम नाट्यरसिकांना भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.
राज चिंचणकर, मुंबई
उस्मानाबाद येथे २१ ते २३ एप्रिल या कालावधीत रंगणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात, तमाम नाट्यरसिकांना भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. नाट्यसंमेलन स्थळी उभारलेल्या विविध रंगमंचावर हे कार्यक्रम होणार आहेत. २१ एप्रिल रोजी नाट्यसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे. २३ एप्रिल रोजी या संमेलनाचा समारोप आहे. या तीन दिवसांत नाट्यसंमेलन नगरीत विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे.
२१ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायंकाळी नाट्यसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या मुख्य सोहळ्यानंतर रात्री ८.३० वाजता नाट्यसंमेलन नगरीतल्या तुळजाभवानी मुख्य रंगमंचावर पु. ल. देशपांडे लिखित ‘तुझे आहे तुझपाशी’ हे नाटक सादर होणार आहे. त्यापूर्वी दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात, ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘षडयंत्र’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.
२२ एप्रिल रोजी रा. प. परमहंस महाविद्यालयातील रंगमंचावर सकाळी १० वाजल्यापासून एकपात्री महोत्सव होईल. रात्री ९ वाजता अंबाजोगाई शाखेतर्फे ‘गोंधळ’ व ‘लळित’ या लोककला सादर होणार आहे. या दिवशी सकाळी १० ते १ या वेळेत श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल येथील मुख्य रंगमंचावर स्थानिक कलाकार लोककला सादर करतील. तर सायंकाळी ६ वाजता अभिनेत्री पद्मश्री कदम यांची प्रमुख भूमिका असलेला ‘खुमखुमी’ हा नाट्यप्रयोग होईल. रात्री ८ वाजता ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या विनोदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात विविध एकांकिका सादर होतील. यात नाट्यपरिषदेच्या सोलापूर उपनगर शाखेची ‘हमसफर’, बीड शाखेची ‘उचल’, सोलापूर उपनगर शाखेची ‘दर्द कोरा’, ठाणे शाखेची ‘अशी मी, अशी मी’, नाशिक शाखेची ‘स्किट’ आदी एकांकिकांचा समावेश आहे. याच रंगमंचावर सायंकाळी ५ वाजता, नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांची प्रकट मुलाखत होईल. त्यानंतर, नाट्यपरिषदेच्या कल्याण शाखेतर्फे ‘विनोदी प्रहसन’, तसेच ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भिडे यांचा ‘अंधारातील स्वगत’ हा नाट्यप्रयोग रंगणार आहे.
शेवटच्या दिवशी म्हणजे, २३ एप्रिल रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथील मुख्य रंगमंचासह, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आणि रा. प. परमहंस महाविद्यालयातील रंगमंचावर स्थानिक कलाकार लोककला सादर करतील. सायंकाळी ५ वाजता जिल्हा क्रीडा संकुलावरील मुख्य रंगमंचावर खुले अधिवेशन आणि नाट्यसंमेलनाचा समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.