भारतीय आध्यात्म, संस्कृतीला नवे परिमाण देणारे नाटक
By admin | Published: April 12, 2017 01:51 AM2017-04-12T01:51:20+5:302017-04-12T01:51:20+5:30
युगपुरुष- महात्मा के महात्मा’ हे केवळ नाटक नाही तर मोलाचा विचार आहे. या नाटकाने भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीला नवे परिमाण देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबई : ‘युगपुरुष- महात्मा के महात्मा’ हे केवळ नाटक नाही तर मोलाचा विचार आहे. या नाटकाने भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीला नवे परिमाण देण्याचा प्रयत्न केला आहे. या नाटकातून श्रीमद्जींचे आध्यात्मिक विचार मराठीतून पोहोचविण्याचा श्रीमद् राजचंद्र मिशनचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रशंसोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
राजेश जोशी दिग्दर्शित ‘युगपुरुष : महात्मा के महात्मा’ या नाटकाच्या पहिल्या मराठी प्रयोगाचा शुभारंभ सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित या प्रयोगाच्या शुभारंभास मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूरचे संस्थापक पूज्य गुरुदेवजी राकेशभाई, अॅड. जनरल रोहित देव, पोलीस महासंचालक सतीश माथूर, जयंत म्हैसकर, अभिनेत्री आदिती गोवित्रीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महात्मा गांधीजींनी खऱ्या अर्थाने सामान्य माणसाला स्वातंत्र्य लढ्यात आणून अहिंसेच्या मंत्राने इंग्रजांना शह दिला आणि हा अहिंसेचा मंत्र गांधीजींना श्रीमद्जींच्या विचारातून मिळाला. महात्मा गांधींनीसुद्धा आपल्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव श्रीमद्जींचा असल्याचे नमूद केले आहे. ३४ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी त्यांच्याकडील ज्ञान आणि विचार समाजापर्यंत पोहोचवले. भारतीय संस्कृतीनुसार बौद्धिक प्रगतीसह आध्यात्मिक प्रगती होणेही महत्वपूर्ण आहे. कुठल्याही क्षेत्रात यश मिळविताना त्याला आध्यात्मिकतेची जोड मिळणे आवश्यक आहे.
यापूर्वी हे नाटक हिंदी, गुजराती, कन्नड या भाषांमध्ये रंगभूमीवर आले असून नाटकाचे १४८ दिवसांत पावणे चारशेहून अधिक प्रयोग झाले आहेत. आता हे नाटक मराठी भाषेत रंगभूमीवर आले असून मराठीतून २५ प्रयोग होतील. लवकरच इंग्रजी, बंगाली आणि तामिळ भाषेतही त ेरंगभूमीवर येईल. प्रसिद्ध लेखक उत्तम गाडा यांनी या नाटकाचे लेखन केले असून संगीत दिग्दर्शन सचिन-जिगर यांचे आहे. (प्रतिनिधी)
जलयुक्त शिवारसाठी ११ लाख
- श्रीमद् राजचंद्र मिशन परिवारामार्फत समाजसेवेचे विविध उपक्रम राबविले जात असून मिशनच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानासाठी ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला.
- या नाटकाच्या मराठीतील २५ प्रयोगांतून प्रति प्रयोगामागे २५ हजार रुपये या अभियानासाठी देण्यात येतील. दुष्काळग्रस्त परिस्थितीत मिशनच्या वतीने बीड जिल्ह्यात केलेल्या विविध समाजोपयोगी कायार्चा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी गौरव केला.