नाट्यसंमेलन अध्यक्ष आता दोन वर्षांसाठी?
By admin | Published: February 21, 2016 03:43 AM2016-02-21T03:43:48+5:302016-02-21T03:43:48+5:30
नाट्यसंमेलनाध्यक्षांना दोन वर्षांचा कालावधी मिळावा, या मागणीची चर्चा रविवारी नाट्य परिषदेच्या नियामक समितीच्या सभेत होण्याची शक्यता आहे. जाणकारांच्या मतानुसार हा निर्णय घेण्यासाठी घटनेत
- महेंद्र सुके, हिंदुहृदयसम्राट , बाळासाहेब ठाकरेनगरी (ठाणे)
नाट्यसंमेलनाध्यक्षांना दोन वर्षांचा कालावधी मिळावा, या मागणीची चर्चा रविवारी नाट्य परिषदेच्या नियामक समितीच्या सभेत होण्याची शक्यता आहे. जाणकारांच्या मतानुसार हा निर्णय घेण्यासाठी घटनेत असलेल्या तरतुदीची अडचण येऊ शकते.
शुक्रवारी उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्षांना एक वर्षाचा कालावधी अपुरा पडतो, तो किमान दोन वर्षांचा असावा, अशी मागणी करण्यात आली होती. घटनेतील तरतुदीनुसार दोन वर्षांसाठी अध्यक्ष नेमता येत नाही, मात्र या वर्षी झालेले अध्यक्ष पुढच्या वर्षीचे अध्यक्ष असणार नाहीत, अशीही अट नाही, असे नाट्य परिषदेच्या घटनेचे अभ्यासक आणि घटना दुरुस्तीचे अध्यक्ष गुरुनाथ दळवी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
रविवारी सकाळी १०.३० वाजता नियामक समितीची सभा दादोजी कोंडदेव क्रीडांगणावर - पॅव्हेलियनमध्ये होणार आहे. या समितीत खुल्या अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या ठरावांवर चर्चा होणार आहे. त्यात दोन वर्षांच्या बहुमानाविषयीचा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो. मात्र, संमेलनाध्यक्षही या सभेला उपस्थित राहणार असल्याने घटनेतील तरतुदीचा मुद्दा समोर करून या विषयावर चर्चा करणे टाळणार, याविषयीची चर्चा नाट्यसंमेलनस्थळी शनिवारी रंगली होती.
आज सांगता
नाट्यसंमेलनाचा सांगता सोहळा रविवारी सायंकाळी ५ वाजता गंगाराम गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये होणाऱ्या या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री अनंत गीते, सुरेश प्रभू, राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.