Corona Virus : दिलासादायक स्थिती, गेल्या सात महिन्यांत राज्यातील मासिक मृत्यूंमध्ये कमालीची घट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 07:54 AM2021-10-29T07:54:32+5:302021-10-29T07:54:55+5:30
Corona Virus : राज्यात एप्रिल महिन्यात २९ हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली होती, मात्र आता १ ते २७ आक्टोबर या काळात हाच मृत्यूंचा आकडा ७३६ वर आला आहे.
मुंबई : कोरोनाच्या दोन लाटांच्या तडाख्यानंतर आता राज्यासह मुंबईतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांचा आकडा २० हजारांच्या खाली आहे. मागील सात महिन्यातील राज्यातील मासिक मृत्यूंमध्येही मोठी घट झाली असून हे प्रमाण आता हजारांच्या आत आल्याची दिलासादायक स्थिती आहे.
राज्यात एप्रिल महिन्यात २९ हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली होती, मात्र आता १ ते २७ आक्टोबर या काळात हाच मृत्यूंचा आकडा ७३६ वर आला आहे. तसेच, एप्रिल महिन्यात १.६५ टक्के मृत्युदराची नोंद झाली होती, हे प्रमाणही आता कमी झाले असून सध्याचा मासिक मृत्युदर १.३९ टक्के आहे.
राज्यातील रुग्णसंख्येचा आलेखही महिन्यागणिक उतरता असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या कोरोनाविषयक अहवालातून समोर आली आहे. राज्यात एप्रिल २०२१ मध्ये १,७८,४०६ रुग्णांचे निदान झाले होते, १ ते २७ ऑक्टोबर या काळात हे प्रमाण ५३,०५६ वर आले आहे. याविषयी राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, दैनंदिन बाधितांचे प्रमाणही जवळपास दोन टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. प्रतिदिन जवळपास दीड लाख चाचण्या केल्या जात असून यात १५०० ते १८०० रुग्णांचे नव्याने निदान होत आहे. ही गेल्या वर्षी मे नंतरची सर्वात कमी रुग्णसंख्या असून संसर्गाचा प्रसार मागच्या काही दिवसांपासून नक्कीच कमी झाला आहे. परंतु जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बाधितांचे प्रमाण हे पाच टक्क्यांहून कमी असणे म्हणजे साथ नियंत्रणाखाली आहे, असे म्हणतात.
राज्यात लसीकरणात पाच जिल्हे आघाडीवर
राज्याने नुकताच नऊ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे, तर दुसरीकडे दोन्ही लस घेतलेल्या लाभार्थींच्या संख्येनेही तीन कोटींचा पल्ला गाठला आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत राज्यात पाच जिल्हे आघाडीवर असून, या पाच जिल्ह्यात सुमारे एकूण ४५ टक्के लसीकरण पार पडले आहे. यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्यात एकूण सहा कोटी ६१ लाख ३३ हजार ८८६ लाभार्थींनी लसीचा पहिला डोस घेतला असून, तीन कोटी एक लाख ४९ हजार ६६५ लाभार्थींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. देशपातळीवर लसीकरणात उत्तर प्रदेश आघाडीवर असून, त्याखालोखाल राज्याने स्थान मिळविले आहे. राज्यात जून महिन्यात सरासरी तीन लाख ३२ हजार १४४ दैनंदिन मात्रा देण्यात आल्या, तर हे प्रमाण जुलै महिन्यात तीन लाख ९१ हजार ७१४ इतके होते.
आगस्ट महिन्यात चार लाख ६७ हजार २२२, सप्टेंबर महिन्यात सात लाख ६० हजार ९५५ आणि १ ते २६ ऑक्टोबरदरम्यान ५ लाख ५३ हजार ३८४ दैनंदिन मात्रा दिल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात १८ पेक्षा अधिक वयाच्या लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस दिला गेलेल्या लाभार्थींचे प्रमाण ७२.३३ टक्के आहे, तर १८ - ४४ वयोगटातील लोकसंख्येपैकी कमीत कमी एक डोस दिलेल्या नागरिकांचे प्रमाण ६३.६५ टक्के आहे. याखेरीज, ४५हून अधिक वय असणाऱ्या कमीत कमी एक डोस दिलेल्या नागरिकांचे प्रमाण ७६.४६ टक्के आहे.