हवामानात नाट्यमय घडामोडी; उन्हाळा, हिवाळ्यासह पावसाळाही एकाच वेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 04:29 AM2020-02-29T04:29:43+5:302020-02-29T07:08:39+5:30
विदर्भात गारांचा पाऊस; मुंबईसह रत्नागिरीचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस
मुंबई : उत्तर कोकणात गुरुवारी आलेल्या उष्णतेच्या लाटेने मुंबईसह रत्नागिरीचे कमाल तापमान ३८ अंश नोंदविण्यात आले. तर शुक्रवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर येथे १३ अंश नोंदविण्यात आले. दुसरीकडे शनिवारी पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हवामानात नाट्यमयरित्या होत असलेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्रात एकाचवेळी उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा असे तिन्ही ऋतू अनुभवास येत असल्याचे चित्र आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. २९ फेब्रूवारी ते १ मार्च दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील. २ मार्च रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.
३ मार्च रोजी गोव्यासह संपुर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. शनिवारसह रविवारी मुंबईचे आकाश निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २२ अंशाच्या आसपास राहील.
गुरुवारचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
रत्नागिरी ३६.६, बीड ३६.१, सोलापूर ३६, जळगाव ३५.८, सांगली ३५.२, सांताक्रूझ ३५.१, परभणी ३४.६, पुणे ३४.१, नाशिक ३३.९, कोल्हापूर ३३.८, डहाणू ३३.५, सातारा ३३.४, माथेरान ३३