प्रवाशांच्या खिशावरच डल्ला
By admin | Published: December 24, 2015 02:13 AM2015-12-24T02:13:40+5:302015-12-24T02:13:40+5:30
एसटी अपघातात मृत प्रवाशांच्या वारसांना आणि जखमी प्रवाशांना एसटीकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ करताना थेट प्रवाशांच्या खिशावरच डल्ला मारण्याचा अजब प्रकार महामंडळाकडून केला जाणार आहे.
सुशांत मोरे, मुंबई
एसटी अपघातात मृत प्रवाशांच्या वारसांना आणि जखमी प्रवाशांना एसटीकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ करताना थेट प्रवाशांच्या खिशावरच डल्ला मारण्याचा अजब प्रकार महामंडळाकडून केला जाणार आहे. एसटी महामंडळाकडून नवी अपघात सहायता निधी योजना सुरू करण्यात येणार असून, यामुळे एसटी तिकिटांच्या किमतीत चांगलीच वाढ होणार आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या नवीन योजनेवर निर्णय होईल, अशी माहिती एसटीतील सूत्रांकडून देण्यात आली.
एसटी महामंडळाच्या गाड्यांना होणाऱ्या अपघातांमध्ये मृत प्रवाशांच्या वारसांना आणि जखमी प्रवाशांना एसटी महामंडळाकडूनच नुकसानभरपाई दिली जाते. यात भरपाईची रक्कम कमी वाटत असल्याने त्यांच्याकडून नुकसानभरपाई स्वीकारली जात नाही. तसेच न्यायालयीन दावेही प्रवासी किंवा त्यांच्या वारसांकडून केले जातात. सध्या मृत प्रवाशांच्या वारसांना ३ लाख रुपये, तर जखमी प्रवाशाला ४0 हजारांपासून ते ७५ हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई दिली जाते. यात बदल करण्याचा निर्णय घेत नवीन अपघात सहायता निधी योजनेनुसार मृत प्रवाशांच्या वारसांना १० लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तर जखमी प्रवाशांना देण्यात येणाऱ्या रकमेतही वाढ होणार आहे. मात्र ही योजना राबविताना प्रवाशांच्या खिशातूनच त्याची वसुली केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. ही वसुली प्रत्येक प्रवाशाच्या तिकिटावर टक्केवारी आकारून केली जाईल. टक्केवारीनुसार आकारणी करावयाची झाल्यास सर्व प्रवाशांना त्यांनी केलेल्या अंतराच्या प्रमाणातच आकारणी होणार आहे. म्हणजेच कमी अंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमी अधिभार व जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्त अधिभार लागू होईल. यामुळे प्रवाशांच्या तिकिटांच्या किमतीत चांगलीच वाढ होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. ही योजना लागू करण्याचा निर्णय जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एसटी बोर्डाच्या बैठकीत होईल.