मतभेदाच्या ‘पाया’वर सत्तेच्या इमारतीचे स्वप्न!

By Admin | Published: June 22, 2017 04:54 AM2017-06-22T04:54:29+5:302017-06-22T04:54:29+5:30

सुप्रिया सुळेंच्या दौ-यात समोर आले तथ्य; राष्ट्रवादीने घेतला निवडणुकीच्या तयारीचा अंदाज.

The dream of building a 'foundation' of the power building! | मतभेदाच्या ‘पाया’वर सत्तेच्या इमारतीचे स्वप्न!

मतभेदाच्या ‘पाया’वर सत्तेच्या इमारतीचे स्वप्न!

googlenewsNext

राजेश शेगोकार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पश्‍चिम वर्‍हाडातील तीनही जिल्ह्यांत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचा १९ ते २१ जून पर्यंत झालेला दौरा हा संवाद दौरा असल्याचे वरकरणी सांगण्यात येत असले, तरी ही निवडणुकीचीच चाचपणी आहे. या दौर्‍यामध्ये सुळे यांच्यासमोर आलेले राष्ट्रवादीमधील कार्यकर्ते व नेते यांमधील मतभेदाचे चित्र प्रकर्षाने समोर आले. मध्यावधी निवडणुकांचे पडघम वाजत असल्याने निवडणुकीच्या तयारीत राहा, असे खुद्द राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनीच सावध केल्यामुळे सध्या राष्ट्रवादीचे नेते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. विदर्भाची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे, त्यांनी केलेल्या दौर्‍यात राष्ट्रवादीमधील मतभेदाची स्थिती अशी स्पष्टपणे अधोरेखित झाल्याने सत्तेची इमारत उभी करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रवादीला सर्वात आधी पक्षांतर्गत आव्हानांचाच सामना करावा लागणार असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर पश्‍चिम वर्‍हाडातील दिग्गज नेते राष्ट्रवादीत सहभागी झाले. अकोला, बुलडाणा या जिल्हा सहकारी बँका, अकोला वगळले तर वाशिम व बुलडाण्यात जिल्हा परिषदेत सत्तेमध्ये वाटा, १९९९ मध्ये तीनही जिल्ह्यांत आमदार अशी पक्षाची सन्मानजनक स्थिती राहिली आहे; मात्र पक्षातील नेत्यांची संख्या जशी वाढली, त्या तुलनेत कार्यकर्त्यांची संख्या वाढली नाही व हा पक्ष नेत्यांच्याच झाला अन् अनेक सत्ताकेंद्र गमावून बसला. मोदींच्या लाटेत तर पक्षाची पूर्णपणे वाताहत झाली, त्यामुळे आता एकही आमदार नसलेले या तीनही जिल्ह्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसाबसा अस्तित्व टिकवून आहे. या पृष्ठभूमीवर पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील शीर्षस्थ नेत्यांना संवाद प्रक्रियेसाठी जिल्ह्या-जिल्ह्यात पाठविले आहे. नेते संवादासाठी आले असतानाच जिल्हा स्तरावर मात्र आपल्याच पक्षाच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संवाद नसल्याचे वास्तव यानिमित्ताने पक्षासमोर आले आहे.
अकोल्याचा विचार केला तर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचीच शिकार करून राष्ट्रवादीने विजयाची मोठी आशा निर्माण केली होती. जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी निवडणुकीची सारी रणनीती आखत राष्ट्रवादी महापलिकेतील महत्त्वाचा पक्ष ठरेल, असेच चित्र निर्माण केले होते. त्यांच्या जोडीला माजी मंत्री गुलाबराव गावंडे हे पक्षात दाखल झाल्यानंतर त्यांनी आघाडीचा महापौर झाला नाही, तर पुढची निवडणूक लढविणार नाही, अशी प्रतिज्ञाच केली होती; मात्र भाजपाच्या लाटेपुढे या सार्‍या रणनीती सपशेल फेल ठरल्या अन् राष्ट्रवादीच्या घड्याळाचा फक्त आवाजच होता वेळ बरोबर नव्हती, हे स्पष्ट झाले. या निवडणुकीत तिकीट वाटप कसे झाले होते, याचा पंचनामाच सुप्रिया सुळे यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी केला. यातील खरे-खोटे तिकीट वाटणार्‍यांनाच माहिती; मात्र खुद्द पवारांच्या लेकीसमोरच अशी भूमिका कार्यकर्ते घेत असतील, तर या तक्रारी निश्‍चितच गांभीर्याने घेण्यासारख्या आहेत. आता तर मध्यावधीसोबतच जिल्हा परिषद निवडणुकांचीही रणनीती ठरत आहे. अशा स्थितीत पक्षातील व्यवस्था अशीच राहिली, तर राष्ट्रवादी उभारी घेईल, असे कोणत्या विश्‍वासाने म्हणता येईल,
वाशिममध्ये यापेक्षा वेगळे चित्र नाही. सुप्रिया सुळे यांचा दौरा ठरला असतानाच राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रकाश डहाके हे शिवसनेच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली. दुसरीकडे नगरपालिका निवडणुकीत पक्षांतर्गत बंडाळी आणि गद्दारांनी छुप्या मार्गाने विरोधकांची साथ दिल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभवाचे तोंड पाहावे लागले. पक्षवाढीसाठी अत्यंत धोकादायक ठरू पाहणारी ही बाब लक्षात घेऊन सर्वप्रथम पक्षांतर्गत गद्दारांचा बंदोबस्त करा, अशी गळ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना घातली.जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष पांडुरंग ठाकरे, बाबाराव खडसे, दिलीप जाधव अशी नेत्यांची दमदार फळी असतानाही वाशिममध्ये राष्ट्रवादीच्या ३0 जागांपैकी केवळ दोन नगरसेवक निवडून आले. हीच स्थिती जिल्ह्यातील इतरही नगर परिषदांमध्ये राहिली आहे.
बुलडाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सत्तेतील क्रमांक दोनचे पद कायम ठेवले असले, तरी यावेळी मात्र काँग्रेसऐवजी भाजपासारखा सवंगडी शोधवा लागला. सत्तेचा वाटा कायम असला, तरी जागा कमी झाल्यात, अशीच स्थिती नगरपालिकांची आहे. लोकसभेची जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादीला सुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विजयापर्यंत पोहोचू शकली नाही अन् विधानसभेत डॉ. राजेंद्र शिंगणे वगळले तर कुणाला यश मिळत नाही, असे चित्र आहे. मुळातच डॉ. राजेंद्र शिंगणे हेच येथील राष्ट्रवादीची ओळख असल्याने किमान संघटना पातळीवर तरी राष्ट्रवादी बर्‍यापैकी मजबूत आहे. त्यासाठी जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी यांचे कौतुकही सुप्रिया सुळे यांनी केले; मात्र एवढे सकारात्मक चित्र असताना लोकसभा व विधानसभेत पराभव का होतो, या प्रश्नाचे उत्तर बुलडाण्यातील कार्यकर्त्यांना देता आले नाही. सुप्रिया सुळे यांनी बुलडाणा लोकसभा आपल्यालाच लढायची आहे, उमेदवार तयार करा, असे आदेशच पदाधिकार्‍यांना दिल्यामुळे पुन्हा एकदा सार्‍यांच्या नजरा डॉ. शिंगणे यांच्याकडे लागल्या आहेत. डॉ. शिंगणे हे विधानसभेत सहज यश मिळवतात; मात्र गेल्यावेळी ते स्वत:हून थांबल्यामुळे पक्षाचा एकही आमदार विजयी होऊ शकला नाही. आता त्यांनी पुन्हा विधानसभा लढावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह असतानाच पक्षाचा हुकमी एक्का म्हणून लोकसभा त्यांच्या गळय़ात पडली, तर ते केवळ डॉ. शिंगणे यांच्यासाठीच नाही, तर राष्ट्रवादीसाठीही मोठे आव्हान असेल; पण ते पेलण्याची ताकद राष्ट्रवादीत आहे का, हा प्रश्नच आहे.
या दौर्‍याचे फलीत कार्यकर्त्यांना दिसायला हवे, आज जशी कार्यकर्त्यांंशी संवाद यात्रा सुरू केली, तशी पक्षपातळीवर कार्यकर्त्यांसाठी सन्मान देण्याची व्यवस्था करावी लागेल. नेत्यांना बाजूला ठेवत नव्या फळीला संधी द्यावी लागेल. केवळ सोशल मीडियावर अँक्टिव्ह आहात का, हा निकष तत्त्वत: ठीक आहे; पण कुठल्याही दृष्टीने सोशल नसलेल्या व केवळ मीडियातच राहणार्‍या नेत्यांना सरसकट नेतेपद देण्याची प्रक्रियाही बंद केली, तर या सत्तेच्या इमारतीची वीट रचता येईल, अन्यथा घड्याळाची टिकटिक आणखी मंदावल्याशिवाय राहणार नाही.


१९ जून : संघटनेची मजबूत बांधणी, जिल्हा परिषदेतील सत्तेचे क्रमांक दोनचे पद कायम, नगरपालिका निवडणुकीतही बर्‍यापैकी यश असे असतानाही लोकसभा व विधानसभेत आपला पक्ष का निवडून येत नाही.. खुद्द सुप्रिया सुळे यांनी बुलडाण्यात विचारलेला प्रश्न
२0 जून : पक्षासाठी आम्ही मरमर मरायचे, संघटना बांधायची, वर्षभर कार्यक्रम घ्यायचे अन् उमेदवारी द्यायची वेळ आली, की आम्हाला बाजूला ठेवून पक्षाबाहेरील लोकांना उमेदवारी द्यायची, हे म्हणजे पेरणी आम्ही करायची अन् पिके भलत्यांनीच कापून न्यायचे, असा प्रकार झाला. हे आणखी किती दिवस चालणार..अकोल्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांंची संताप.
२१ जून : नगर परिषद निवडणुकीदरम्यान स्थिती सकारात्मक असतानाही ऐनवेळी पक्षातीलच काही मंडळींनी गद्दारी केल्याने पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रथम पक्षातील अशा गद्दारांना निवडून त्यांना बाजूला करावे लागेल, तेव्हाच पक्षाला पुन्हा चांगले दिवस येतील..वाशिममधील कार्यकर्त्यांंची मागणी

Web Title: The dream of building a 'foundation' of the power building!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.