स्वप्नसंकल्पांचं सोळावं...
By Admin | Published: January 1, 2016 04:40 AM2016-01-01T04:40:58+5:302016-01-01T04:40:58+5:30
आम्ही सोळा जणी... सरत्या वर्षाला निरोप देताना आणि २०१६ सालात प्रवेश करताना सोळावं वरीस स्वप्नांचं असा उत्साही अन् सळाळता संदेश या सोळा वर्षांच्या सोळा जणी देत आहेत...
आम्ही सोळा जणी... सरत्या वर्षाला निरोप देताना आणि २०१६ सालात प्रवेश करताना सोळावं वरीस स्वप्नांचं असा उत्साही अन् सळाळता संदेश या सोळा वर्षांच्या सोळा जणी देत आहेत... नवे वर्ष खूप घटनांनी भरलेले आणि भारलेले असणार यात शंका नाही. या वर्षाचे सोळा स्वप्नसंकल्प घेऊनच नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी शुभसंदेशाचे स्वप्नपाऊल टाकू यात. लोकमत परिवाराकडूनही आपणा सर्वांना हीच सदिच्छा...
2016 पुढे चालू...
आले आले सोळा। पोटामध्ये गोळा।
फटाक्यांच्या माळा। पुढे चालू।।
मुंबईचा भेजा। पडे का गहाण।
महापौर छान। पुढे चालू।।
बिघडले आहे। रेलवे इंजिन।
कार्यकर्ते तीन। पुढे चालू।।
मोठे मासे तरी। आहेत बाहेर।
जरी परमार। पुढे चालू।।
राधे माँच्या वर। इंद्राणीचा तोरा।
सेनसेक्स बोरा। पुढे चालू।।
दारू कोण प्याला। गाडी की नट?
पोलीस चावट। पुढे चालू।।
वेगळा विदर्भ। वेगळा कोकण।
मराठीचा गुण। पुढे चालू।।
पुण्यामध्ये पिंगा। लुंगा मुंगा पुंगा।
मस्तानी लेहंगा। पुढे चालू।।
पाण्यावाचूनीया। तळमळे जैसा।
मालवणी मासा। पुढे चालू।।
चारोळी सम्राट। गेले कुठे हल्ली।
रामदासी खिल्ली। पुढे चालू।।
पंचाइत्तरीची। लावूनिया बत्ती।
भावी राष्ट्रपती। पुढे चालू।।
बूमरँग आप। सीबीआय धाड।
फुटले थोबाड। पुढे चालू।।
‘हात’च्या काकणा। हेराल्ड कशाला।
जामीन उशाला। पुढे चालू।।
वाढताही वाढे। कांदा, तूरदाळ।
अच्छे दिन लाळ। पुढे चालू।।
द्या हो आता मला। तुम्ही पुरस्कार।
सहिष्णुता फार। पुढे चालू।।
- महेश केळुसकर
जीएसटी येणार?
देशाच्या करप्रणालीत सुसूत्रता आणतानाच देशाच्या विकासदरवाढीस हातभार लावेस अशी जीएसटी (गुडस् अॅण्ड सर्व्हिस टॅक्स) प्रणाली अंतिम टप्प्यात असून, राजकीय मोहर उमटण्याच्या प्रतीक्षेत आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी मिळाल्यास १ एप्रिल २०१६पासून देशात जीएसटी नामक नवी कर प्रणाली कार्यान्वित होईल.
पाच विधानसभांचे फड
या वर्षाच्या मध्यात तमिळनाडू, प. बंगाल, केरळ, पुद्दुचेरी आणि आसाम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. तमिळनाडू, बंगाल व केरळ विधानसभांची मुदत मेच्या शेवटच्या आठवड्यात तर पुद्दुुचेरी व आसाम विधानसभांची मुदत जूनच्या पहिल्या आठवड्यात संपत आहे. त्यामुळे या पाचही निवडणुका बहुधा एकाच वेळी घेतल्या जाण्याची शक्यता आहे.
अमेरिका निवडणूक
दोनशेहून अधिक वर्षांच्या इतिहासात अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णी राष्ट्राध्यक्ष बनून इतिहास घडविणारे बराक ओबामा या वर्षी पायउतार होतील. अमेरिकेचा ५८वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यास ४ ते ८ नोव्हेंबर दरम्यान निवडणूक होईल.
ई-आयपीओ प्रणाली
सध्या एखाद्या कंपनीला प्राथमिक समभाग विक्रीसाठी (आयपीओ) प्रक्रिया सुरू करायची असल्यास आयपीओसाठी अर्ज ते मंजुरीसाठी साधारण एक वर्षाचा कालावधी लागतो. परंतु, आजपासून सेबीमध्येही (१ जानेवारी २०१६) देशात ‘ई-आयपीओ’ प्रणाली कार्यान्वित झाली आहे. यामुळे सध्याच्या प्रक्रियेच्या कालावधीत लक्षणीय कपात होत हा कालावधी ३ महिन्यांवर येईल.
बँकिंग सुधारणा
जन-धन योजनेच्या माध्यमातून बँक ग्राहकांच्या संख्येत वाढ करण्यात सरकारला यश आल्यावर आता बँक उद्योगाला गतिमान करण्यासाठी महत्त्वाच्या सुधारणांना या वर्षी मूर्त रूप येईल. अल्पबचतीच्या व्याजदराची व्यवस्था सरकारी नियंत्रणातून मुक्त करणे, रिझर्व्ह बँक गव्हर्नरच्या अधिकारांत कपात करून समिती स्थापन करणे आदींचा समावेश आहे.
धोनीची निवृत्ती?
साऱ्या क्रिकेटप्रेमींचे विशेष लक्ष असेल ते जादुई कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर. गतवर्षी ३० डिसेंबरला धोनीने आॅस्ट्रेलियाशी सुरू असलेल्या सामन्यावेळी अचानक कसोटीला राम राम करून निवृत्ती घेतली.
या वर्षी तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो.
टी-२० वर्ल्डकप
यंदा होणारा टी-२० विश्वचषक भारतीयांसाठी आणि खासकरून धोनी चाहत्यांसाठी विशेष असेल. अनपेक्षित धक्के देण्यात तरबेज असलेला धोनी या वेळी कोणता धक्का देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
खान त्रिमूर्तींचे चित्रपट
येणारे वर्ष ३ खानांच्या आगामी चित्रपटांचे असेल. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या सलमान, शाहरूख आणि आमीर या तीनही खानांची जादू अजूनही बॉक्स आॅफिसवर चालते. सलमानचा ‘सुलतान’, आमीरचा ‘दंगल’ व शाहरूखचा ‘रईस’ तसेच ‘फॅन’ आतापासूनच आगामी आकर्षण म्हणून गाजताहेत. बॉलीवूड ही कोणाची ‘सल्तनत’ याचा फैसला करू पाहणारी चित्रपटांची ही दंगल कमालीची रंजक ठरेल.
मेट्रोची स्वप्नपूर्ती?
नव्या वर्षात मुंबईसह राज्यभरात पाच नवीन मेट्रो मार्गांचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ, दहिसर (पू.)-अंधेरी (पू.) आणि डी.एन. नगर असे हे तीन
मार्ग मुंबईत असतील. तसेच पुणे आणि नागपूरमध्येही मेट्रोचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. मुंबईत
कोस्टल रोडही सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबईहून मोठे शहर
ठरल्याप्रमाणे सर्व गोष्टी झाल्यास येत्या वर्षात सरकार नियोजित नवी मुंबई विमानतळाच्या परिसरात नैना हे नवेकोरे शहर वसवण्यास सुरुवात करेल. ६०० किमी भूभागावरील हे शहर पायाभूत सुविधांच्या बाबतीत आधुनिक असेल.
शौचालय सुविधा
महाराष्ट्रात ४१ दशलक्ष लोकांना अद्याप शौचालयासारखी मूलभूत सुविधाही मिळालेली नाही. म्हणूनच राज्यातील सर्व २६५ शहरांमध्ये एकही व्यक्ती शौचालयापासून वंचित राहू नये, यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. हे लक्ष्य तीन वर्षांत गाठायचे आहे. पहिल्या टप्प्यात ५० शहरांत हे लक्ष्य गाठण्यात आले आहे.
परवडणाऱ्या दरात घरे
राज्य सरकारने दिलेले आश्वासन पाळले तर २०१६मध्ये महाराष्ट्रात गृहनिर्माण नियामक लागू होऊ शकते. याद्वारे घर घेणाऱ्यांची बिल्डर लॉबीद्वारे होणारी पिळवणूक थांबू शकेल. गृहनिर्माण क्षेत्रात राज्य
सरकारने घोषित केल्याप्रमाणे २०२२पर्यंत १९ लाख परवडणारी घरे मिळू शकतात. त्यासाठीच्या उपाययोजना२०१६मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
पायाभूत सुविधा
मोदी सरकारकडून या वर्षात पायाभूत सुविधांचे धडाकेबाज काम होणे अपेक्षित. रेल्वेसाठी स्वतंत्र नियमक संस्था व स्थानकांचा पुनर्विकास ही महत्त्वाची कामे असतील. राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचा दर प्रतिदिन ३० किमी करण्यास गुंतवणूकदारांना नव्या ‘हायब्रीड अॅन्युईटी’ योजनेची प्रतीक्षा आसेल. २० ‘स्मार्ट सिटी’चे प्रत्यक्ष कामही सुरू होईल.
कम्युनिकेशन ‘वे’
मुंबई-नागपूर कम्युनिकेशन सुपर एक्स्प्रेस-वेची यंदा सुरुवात होऊन तो २०१९पर्यंत पूर्ण होईल. मुंबई-औरंगाबाद-नाशिक-नागपूर असा हा सहा पदरी मार्ग १४ जिल्ह्यांमधून जाईल आणि त्यावर ३० हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत तो बांधण्यात येणार आहे. या मार्गाने मुंबई ते नागपूर हे अंतर
१० तासांत पार करता येईल.
पॅन कार्डाची व्याप्ती
५० हजार रुपयांवरील
रोखीचे व्यवहार, मुदत ठेवी,
२ लाख रुपयांवरील खरेदी तसेच बँक खाते आणि अन्य सर्व वित्तीय सेवांसाठी आजपासून पॅन कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. काळ्यापैशाला चाप लावण्यासाठी सरकारने विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले असून, पॅन कार्डाची व्याप्ती वाढविणे हा त्याच मोहिमेचा भाग आहे.
रिओ ‘आॅलिम्पिक’
सर्वांची उत्सुकता ताणली गेली आहे ती ‘आॅलिम्पिक’साठी. ब्राझीलमधील रिओ शहरामध्ये रंगणाऱ्या या क्रीडा मेळाव्यात जगभरातील अव्वल खेळाडूंचे कौशल्य पाहण्यास मिळेल.