महाराष्ट्राला पडलेलं देखणं, सुरेल स्वप्न - बालगंधर्व...!

By Admin | Published: July 15, 2016 08:32 AM2016-07-15T08:32:39+5:302016-07-15T08:35:46+5:30

महाराष्ट्राला पडलेलं देखणं, सुरेल स्वप्न अशी ख्याती असलेले नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व यांची आज (१५ जुलै) पुण्यतिथी!

The dream of Maharashtra, Surl dream - Balgandharva ...! | महाराष्ट्राला पडलेलं देखणं, सुरेल स्वप्न - बालगंधर्व...!

महाराष्ट्राला पडलेलं देखणं, सुरेल स्वप्न - बालगंधर्व...!

googlenewsNext
>संजीव वेलणकर 
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १५ -  महाराष्ट्राला पडलेलं देखणं, सुरेल स्वप्न अशी ख्याती असलेले नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व यांची आज (१५ जुलै) पुण्यतिथी...! २६ जून, १८८८ साली सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यात नागठाणे येथे जन्मलेले नारायण श्रीपाद राजहंस हे बालगंधर्व या नावानेच अधिक लोकप्रिय होते. ते विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्मातेही होते.
 रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. बालगंधर्व भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरुबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले. बालगंधर्वानी आपल्या भूमिका साकारनाच संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई प्रभृतींनी लिहीलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली. बालगंधर्वांनी कंपनीतील सर्वांना चांदीच्या थाळीतून वरण-भात तूप आणि पक्वान्नं खाऊ घातली, त्यांनाच आंधळ्या प्रेमापोटी जर्मनच्या थाळीतून जेमतेम अर्धी भाकरी अन्‌ मूठभर भात खाण्याची वेळ यावी, यापरता दैवदुर्विलास कोणता? मोत्यांचा चारा खाऊन जगणाऱ्या "राजहंसा‘वर अशी वेळ आली, ती निव्वळ अव्यवहारीपणा, आंधळं प्रेम अन्‌ व्यक्तिगत अवगुणांमुळं, असं आचार्य प्र. के. अत्रे, गंधर्व कंपनीतील हीरो-कृष्णराव चोणकर आणि विनायकराव पटवर्धन-यांनी लिहून ठेवलंय...अन्‌ तरीही अनुपम सौंदर्य अन्‌ स्वर्गीय गाणं यामुळं "असा बालगंधर्व आता न होणे‘ हे शब्द सार्थच ठरतात!
 
बालगंधर्व हे महाराष्ट्राला पडलेलं देखणं, सुरेल स्वप्न होतं. महाराष्ट्राचे महाकवी ग. दि. माडगूळकर यांनी त्यांचं यथार्थ वर्णन केलंय... 
जशा जन्मती तेज घेऊन तारा । जसा मोर घेऊन येतो पिसारा । 
तसा येइ कंठात घेऊन गाणे । 
असा बालगंधर्व आता न होणे ।। 
रतीचे जया रूपलावण्य लाभे । 
कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे । 
सुधेसारखा साद; स्वर्गीय गाणे। 
असा बालगंधर्व आता न होणे ।। 
 
अनुपम सौंदर्य अन्‌ स्वर्गीय गाणं यामुळं "असा बालगंधर्व आता न होणे‘ हे शब्द सार्थच ठरतात!
‘गंधर्व’ या शब्दात काहीतरी विलक्षण जादू असलीच पाहिजे. कारण या शब्दावर आधारून जितक्या पदव्या दिल्या गेल्या किंवा घेतल्या गेल्या तितक्या दुसर्याल कोणत्याही शब्दाच्या वाट्याला आल्या नाहीत. बालगंधर्व, भूगंधर्व, सवाई गंधर्व, महाराष्ट्र गंधर्व, कुमार गंधर्व, छोटा गंधर्व, नूतन गंधर्व, हिंद गंधर्व, आनंद गंधर्व, भावगंधर्वपासून अक्षरशः डिट्टो गंधर्वपर्यंत गंधर्वांची एक मांदियाळीच महाराष्ट्रात तयार झाली. यांपैकी बर्यााच जणांनी आपल्या कर्तृत्वाने ती पदवी सार्थ करून दाखवली आणि काहीजणांनी आपल्या अतिहुशारीमुळे त्या पदवीलाच लाजविले. नारायण श्रीपादराव राजहंस या माणसाने मात्र ‘बालगंधर्व’ ही आपणाला मिळालेली पदवी अजरामर केली. बरं, ही पदवी बहाल करणारा माणूस तरी लेचापेचा होता? अजिबात नाही. १८९८ साली नारायण राजहंस या छोट्या मुलाचं गाणं ऐकून ‘अरे, हा तर साक्षात बालगंधर्व आहे!’ असे उद्गार काढणारी ती व्यक्ती कोण असेल? भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अध्वर्यू, असंतोषाचे जनक, प्रख्यात प्रकांड पंडित, भगवद्गीतेचे भाष्यकार, ज्योतिर्विद्येचे जाणकार आणि वैदिक गणितज्ज्ञ- साक्षात लोकमान्य टिळक!
 
या घटनेचं वर्णन करताना गदिमांनी लिहिलंय-
 
त्याच संधिला कुणा अनामिक रसिकाची हौस
टिळकांपुढती ठेवि बोलका कुणी राजहंस
राजहंस तो नेत्यासन्मुख गीत मनोहर म्हणे
देवदत्त तो साद मनोहर ऐकूनिया कानी
बाल गायका अमोल पदवी दिली टिळकांनी
शिरोधार्य ते दान मानिले इवल्या नारायणें
तो तोच बालगंधर्व
जाणिती सर्व
वाढला पुढती
यशसिद्धी राहिली त्याची सदोदित चढती
वाढला बालगंधर्व युगंधर झाला
वर्षाव प्रीतीचा रसिकजनांनी केला
सन्मान असा ना मिळतो सम्राटाला
मंत्रमुग्ध जन होत राहिले त्यांच्या मधुगायनें…
 
साक्षात सम्राटालाही मिळत नाही असा मान बालगंधर्वांना मिळाला. जवळपास पन्नास वर्षे रसिकमनावर त्यांनी अधिराज्य केले. आवाजाच्या जोरावर ते संगीतातील विलक्षण जादूगार झाले. ज्याप्रमाणे त्यांचे रूप मोहक होते त्याचप्रमाणे त्यांचा आवाजही मोहिनी घालणारा होता. अत्यंत मधुर, झार असलेला स्वयंप्रकाशी असा तो आवाज होता. त्यांच्या आवाजाच्या झारेला इंद्रधनुष्यातील विविध रंगांच्या छटांची उपमा एका मर्मज्ञ रसिकाने दिली होती व ती सार्थही होती. इतर कलावंत गायकांप्रमाणे जरी त्यांच्या गायनात पुष्कळ तर्हाआ नसल्या तरी त्यांचे साधेसुधे गोड गाणे आल्हाददायक बनू शकले ते या कंठमाधुर्याच्या देणगीवरच! हा आवाज प्रत्यक्ष ऐकण्यासाठी लोक शेकडो मैलांवरून धावत येत; तारेने थिएटरमध्ये जागा रिझर्व्ह केल्या जात; स्पेशल मोटारी सोडल्या जात. एवढेच नव्हे तर नाटकाच्या तिस-या अंकापर्यंत तिकिटं मिळवण्याची लोक खटपट व धडपड करीत. असं काय बालगंधर्वांमध्ये होतं की त्यांना पाहायला, ऐकायला लोक एवढे वेडावले होते? ही सर्व किमया बालगंधर्वांच्या जादुई आवाजाची होती! ऑर्गन व सारंगीवर त्यांनी आपला आवाज मिळवला की त्या तीन सुंदर स्वरांच्या मिलाफाने श्रोत्यांच्या कानांचे समाधान होऊन अंगावर रोमांच उभे राहत. रंगमंदिरात विलक्षण शांतता प्रस्थापित होई. 
१९८८ साली भारत सरकारने बालगंधर्व यांचे पोस्टाचे तिकीट त्यांच्या स्मृती निमीत्त छापले. 
 
मा. बालगंधर्व यांचे १५ जुलै १९६७ रोजी निधन झाले. लोकमत समूहातर्फे मा. बालगंधर्व यांना आदरांजली. 

Web Title: The dream of Maharashtra, Surl dream - Balgandharva ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.