मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 05:47 AM2024-10-10T05:47:01+5:302024-10-10T05:48:18+5:30
देशाचा कल कुणीकडे आहे, हे हरयाणाच्या निकालाने दाखवून दिले. काँग्रेस समाजात द्वेष पसरविणारा बेजबाबदार पक्ष असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई/नागपूर/शिर्डी :वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासासाठी मातृभाषेत पुस्तके उपलब्ध नव्हती, परंतु केंद्र सरकारने ही कमतरता दूर केली आहे. आता महाराष्ट्रातील युवकांनाही मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण घेता येईल आणि आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे आपले स्वप्न ते पूर्ण करतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला.
केंद्रीय वैद्यकीय आयोगाने मंजुरी दिलेल्या राज्यातील १० वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन आणि नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कार्गो धावपट्टी व टर्मिनल इमारतीचे तसेच शिर्डी विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे दूरदृश्य प्रणालीद्वारे भूमिपूजन बुधवारी पंतप्रधान मोदी यांनी केले.
काँग्रेस बेजबाबदार पक्ष
देशाचा कल कुणीकडे आहे, हे हरयाणाच्या निकालाने दाखवून दिले. काँग्रेस समाजात द्वेष पसरविणारा बेजबाबदार पक्ष असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.
कुठे असतील ही महाविद्यालये?
ठाणे, मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, अमरावती, भंडारा, गडचिरोली.
आज आपण केवळ इमारती बांधत नाही, तर निरोगी आणि समृद्ध महाराष्ट्राचा पाया रचत आहोत. लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्यात १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली आहेत. यामुळे महाराष्ट्रात आणखी ९०० वैद्यकीय जागा निर्माण होतील. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान.
काही वर्षांतच नागपूर विमानतळावरून १०० विमानांची सेवा सुरू होईल. दरवर्षी १४ लाख प्रवासी ये-जा करतील आणि ९ लाख टन कार्गोची निर्यात होईल. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.
नागपूर विमानतळ हे आता विदर्भासाठी ग्रोथ इंजिन म्हणून उदयास येईल. विमानतळाच्या प्रत्येक कामावर मी सुपरवायझरसारखे लक्ष ठेवणार आहे. - नितीन गडकरी, रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्री.
कार्गो धावपट्टी आणि टर्मिनल इमारतीमुळे नागपूर विमानतळ जागतिक दर्जाचे बनेल. - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री.