लाल फितीमुळे भंगले भरतीचे स्वप्न
By Admin | Published: May 11, 2016 04:00 AM2016-05-11T04:00:29+5:302016-05-11T04:00:29+5:30
पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बांधून इतरांप्रमाणे ‘त्या’ तिघांनीही धडपड सुरू केली. अखेर या धडपडीला यशही मिळाले. अवघे काही गुण मिळाल्याने ते प्रतीक्षा यादीत राहिले.
मनीषा म्हात्रे, मुंबई
पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बांधून इतरांप्रमाणे ‘त्या’ तिघांनीही धडपड सुरू केली. अखेर या धडपडीला यशही मिळाले. अवघे काही गुण मिळाल्याने ते प्रतीक्षा यादीत राहिले. मात्र, प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसल्याने यंदाच्या पोलीस भरतीपूर्वीच ‘त्या’ तिघांना बाद करण्यात आल्याने त्या तिघांचेही स्वप्न भंगले. तथापि, या तिघा उमेदवारांनी पोलीस होण्यासाठीचा लढा अद्यापही सुरूच ठेवला आहे.
२०१४ -१५ पोलीस भरतीदरम्यान वाशिम जिल्ह्यासाठी ११६ पदांसाठीची भरती प्रक्रिया पार पडली. या भरतीप्रक्रियेत हजारो उमेदवारांच्या रांगेत वाशिम येथील माजी सैनिक गजानन रामभाऊ राऊत, नांदेडचे खेळाडू दीपक अशोक भडांगेसह वाशिमचा विठ्ठल सीताराम सुर्वेचाही समावेश होता. गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस नोकरीचे स्वप्न बाळगून हे तिघे पोलीस भरतीत सहभाग घेत होते. अखेर २०१४ च्या पोलीस भरतीत काही गुण कमी पडल्याने ते प्रतीक्षा यादीत फेकले गेले. या दरम्यान, १०८ उमेदवारांची नियुक्ती झाली, तर उर्वरित आठ पदांपैकी ५ पदांमधील उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्याने त्यांची पदे रिक्त ठेवण्यात आली. तर उर्वरित तीन उमेदवारांना दुसरीकडे संधी मिळाल्याने तेदेखील हजर झाले नाहीत. या भरतीत तिघेही आपापल्या वर्गवारीमधून प्रतीक्षा यादीतील प्रथम दावेदार होते. प्रतीक्षा यादीचा कालावधी १ वर्षाचा असतो. माघार घेतलेल्या उमेदवारांनी निवड यादी प्रसिद्ध झाल्यापासून ६ महिन्यांच्या आतच वाशिमच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात तसे लेखी स्वरूपात कळवले. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील तिघांची निवड होणे अपेक्षित होते. याबाबत या तिघा उमेदवारांनी कार्यालयाशी वारंवार संपर्क साधला. तेव्हा खेळाडू असलेल्या उमेदवारचे प्रमाणपत्र पुण्याच्या क्रीडा संचालनालयाकडे प्रमाणित करण्यासाठी पाठविल्याचे सांगण्यात आले. ते आल्यानंतर तुमची नियुक्ती होईल, असे सांगण्यात आले. त्यानंतरही वारंवार भेटून चौकशी केल्यानंतरही प्रमाणपत्र प्रमाणित होऊन आलेले नसल्याचे सांगण्यात आले. तुम्हाला नक्कीच बोलवण्यात येईल, तुम्ही काळजी करू नका, अशी उत्तरे वाशिमच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली.
अखेर प्रमाणपत्र प्रमाणित होऊन आले. त्यानंतर, वाशिमच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून वैद्यकीय चाचणीसाठी बोलाविण्यात आले. या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी वाशिमच्या जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालयात २१ आॅक्टोबर २०१५ ला घेण्यात आली. त्यानंतरच्या आठवड्यात तिघांची चारित्र्य पडताळणीसुद्धा पार पडली. या चाचण्यांची प्रमाणपत्रे वाशिमच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा देखील झाली.
नोकरीच्या पाठपुराव्यासाठी नांदेडचा दीपक दोनशे ते अडीशे किलोमीटरचे अंतर कापून वारंवार वाशिम येथे येत राहिला. चकरा मारण्यात असलेले पैसेही संपले, तर विठ्ठलची शाळेत असलेली नोकरी सुटल्याने त्याची आर्थिक बाजू अधिक कमकुवत झाली. सध्या आई-वडिलांसह मतिमंद भावाची जबाबदारी त्याच्या एकट्याच्या खांद्यावर आहे. स्वाभिमान न सोडता त्याने कष्ट सुरूच ठेवले आहेत. कुटुंबाच्या पालनपोषणासाठी नोकरी अभावी स्टेशन परिसरात तो सध्या भाजी विकण्याचे काम करत आहे. माजी सैनिक असलेले गजानन यांच्यावरही लाल फितीच्या कारभारामुळे पायपीट करण्याची वेळ ओढावली. तरीदेखील आज ना उद्या नोकरी मिळेल, या आशेने या तिघांनी लढा सुरू ठेवला. २०१६ची पोलीस भरती आली, तरीदेखील आपली नियुक्ती होत नसल्याने, या तिघा उमेदवारांनी वाशिमच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाशी पुन्हा पत्रव्यवहार केला. त्यावरही काहीच कारवाई झाली नाही.
अखेर तिघांनीही अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांची या तिघांनी भेट घेतली. त्यानंतर, सूत्रे तातडीने हलली. अमरावतीहून वाशिमच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाला या प्रकरणी ७ दिवसांच्या आत लेखी अहवाल सादर करण्याचे सांगण्यात आले. विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाकडून २-३ वेळा स्मरणपत्रे पाठवूनही अधीक्षक कार्यालयाने त्याला दाद दिलेली नाही. पोलीस शिपाईपदी निवड झाली असल्यामुळे त्यांनी नवीन पोलीस भरतीसाठी अर्जदेखील केला नाही. सगळ््या प्रयत्नांनंतर वाशिमच्या पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी ‘तुमच्या प्रकरणाला १ वर्ष झाल्याने तुम्हाला नियुक्ती आदेश देऊ शकत नाही’, असे त्यांनी ३० मार्च रोजी पत्राद्वारे कळविले.
> प्रशासनाच्या दिरंगाईमुळे उशीर
सगळ्या चाचण्या पार पडूनही त्यांची पुढे निवड झाली नाही. लवकरच नियुक्ती मिळेल, असे वारंवार सांगितले जात होते. अधीक्षक कार्यालयाच्या पायऱ्या मात्र ते झिजवत राहिले. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे उशीर झाल्याने आपला नेमका काय दोष? हे अजूनही या उमेदवारांना उमगलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांसह संबंधित अधिकारी वर्गाकडे त्यांनी आपल्याला न्याय मिळावा, यासाठी लढा सुरू ठेवला आहे. याबाबत वाशिमचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते संपर्कात येऊ शकले नाहीत.
गजानन रामभाऊ राऊत
सैन्यात २० वर्षे कार्यरत २० वर्षांनंतर पुन्हा देशसेवेची आशापोलीस नाव प्रतीक्षा यादीत त्यानंतर अजूनही ताटकळत
दीपक अशोकराव भडंगे नांदेडच्या शेतकरी कुटुंबातील मुलगा सध्या सातबारावर ४ लाखांचे कर्ज सततचा दुष्काळ व नापिकी
कुटुंबात आई सतत आजारी शेतात काम करून शिक्षण केले पूर्ण
> विठ्ठल सीताराम सुर्वे
वडिलांकडे २ एकर कोरडवाहू
शेती
सतत दुष्काळ व नापिकीमुळे शेती कर्ज वाढले
बँक व सावकाराचे दीड लाखांचे कर्ज
खासगी शाळेत सहायक शिक्षक म्हणून काम
ही तात्पुरती नोकरीही सोडावी लागली
सध्या कोणतीही नोकरी नाही