मुंबईतील शाळेचा विद्यार्थ्यांसोबत पालकांसाठीही ड्रेस कोड
By admin | Published: April 4, 2017 01:41 PM2017-04-04T13:41:35+5:302017-04-04T13:41:35+5:30
शिस्त लागावी यासाठी विद्यार्थ्यांना नियम आखून देणा-या वांद्र्यातील एका शाळेने पालकांनाही ड्रेस कोड जारी केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - शिस्त लागावी यासाठी विद्यार्थ्यांना नियम आखून देणा-या वांद्र्यातील एका शाळेने पालकांनाही ड्रेस कोड जारी केला आहे. शाळेत होणा-या मीटिंगमध्ये येताना पालकांनी कोणते कपडे घालावेत यासाठी शाळेने नियम आखून दिले आहेत. शाळेतल्या मीटिंगमध्य येताना पालकांनी साधे आणि शालीन कपडे परिधान करुन यावं असा आदेशच शाळेने देऊन टाकला आहे.
वांद्रयातील रिझवी स्प्रिंगफिल्ड शाळेतील नववी इयत्तेत शिकणा-या विद्यार्थ्यांचे पालक 30 मार्च रोजी प्रगती पुस्तक घेण्यासाठी शाळेमध्ये पोहोचले होते. यावेळी शाळेची नियमावली त्यांच्या हाती सोपवण्यात आली. सर्व पालकांनी या नियमावलीवर स्वाक्षरी करावी अशी त्यांची अपेक्षा होती. "मी शाळेत येताना साधे आणि शालीन कपडे परिधान करुन येईन. जर मी असं केलं नाही तर होणा-या परिणामांसाठी मी स्वत: जबाबदार असेन" असं या नियमावलीत लिहिण्यात आलं होतं.
एवढंच नाही तर मीटिंगला येत असताना पालकांनी आपले मोबाईल फोन रिसेप्शनवरच जमा करुन यावेत असं सांगण्यात आलं आहेत. तसंच स्टाफला विनाकारण कोणतेही प्रश्न विचारले जाऊ नयेत, आणि त्यांच्याशी सभ्य भाषेत बोलावं असंही नियमावलीत सांगण्यात आलं आहे.
शाळेने काढलेला हा आदेश अनेक पालकांना आवडलेला नसून त्यांनी आपला निषेध व्यक्त केला आहे. पालकांनी काय घालावं किंवा काय घालू नये, मोबाईल वापरावा का, हे आम्हाला शाळेने सांगू नये, अशी संतप्त प्रतिक्रिया काही पालकांनी दिली. तर शाळेचा स्टाफ, फी वाढ आणि व्यवस्थापन याबाबत अनेक तक्रारी आहेत. आमच्यापैकी काही जण त्याचा विरोध करत आहोत. त्यामुळे आमचा आवाज दाबण्यासाठीच ही नियमावली आणल्याचा आरोप पालकांनी केला आहे.