रखडले अग्निशमन केंद्र
By admin | Published: October 31, 2016 01:13 AM2016-10-31T01:13:46+5:302016-10-31T01:13:46+5:30
हडपसर परिसरात गेल्या काही वर्षांत आगी लागण्याच्या अनेक घटना घडल्या.
हडपसर : हडपसर परिसरात गेल्या काही वर्षांत आगी लागण्याच्या अनेक घटना घडल्या. त्यात वित्तहानी व जीवितहानीही झाली. त्यामुळे हडपसर परिसरासाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी आहे. मात्र, राजकीय पुढाऱ्यांच्या व पालिका प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.
अडीच वर्षांपूर्वी मगरपट्टा चौकातील लोहियानगर झोपडपट्टीत लागलेल्या आगीत काहींना प्राणास मुकावे लागले. गाडीतळ, अमरनगरी येथे, तसेच काही दुकानांना आगी लागण्याचे प्रकार घडले. गेल्या काही वर्षांत आगीच्या घटना वारंवार घडलेल्या असतानाच पंधरा नंबर येथील बेकरीला आग लागली. आगीच्या घटना घडल्यास हडपसरमध्येच स्वतंत्र अग्निशमन केंद्राची आवश्यकता आहे.
आग लागल्यानंतर काही तास संपर्क करूनही अनेक वेळा उपाययोजना मिळत नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधी यांच्या कुरघोडी राजकाराणांमुळेच याठिकाणचा स्वतंत्र अग्निशमन केंद्राचा प्रश्न प्रलंबित राहिला असून, त्याकडे पालिका प्रशासनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिकांकडून होत आहे.
आश्वासनांची पूर्ती नाहीच
वारंवार आगी लागण्याच्या घटना घडल्यानंतर या परिसरातील लोकप्रतिनिधी येतात, बाधितांचे सांत्वनही करतात. लवकरच हडपसरसाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्याचे आश्वासनही गेल्या काही वर्षांत अनेक वेळा या राजकीय मंडळींनी दिले आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणतेही काम करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
हडपसर उपनगर हे झपाट्याने विकसित होत आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथे स्वतंत्र अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी आहे. महापालिका उद्योजकांना कोणत्याही सुविधा देत नाही. कराचा बोजा मात्र लादते, असे येथील उद्योजकांचे म्हणणे आहे.