दूध हे औषधाप्रमाणे प्यावे
By admin | Published: June 12, 2017 01:45 AM2017-06-12T01:45:32+5:302017-06-12T01:45:32+5:30
दूध हे औषधाप्रमाणे प्यायले पाहिजे. कारण श्वेत क्रांती झाल्यापासून दुधाचा व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. मशीनद्वारे दूध काढताना त्यात गाईचे रक्तदेखील मिश्रित होत असते
लोकमत न्यूज नेटवर्क
बिबवेवाडी : दूध हे औषधाप्रमाणे प्यायले पाहिजे. कारण श्वेत क्रांती झाल्यापासून दुधाचा व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे.
मशीनद्वारे दूध काढताना त्यात गाईचे रक्तदेखील मिश्रित होत असते, असे मत प. पू. लब्दीचंद्रजी म. सा. यांनी व्यक्त केले.
शाकाहार या विषयावर बोलण्यासाठी सर्व धर्माच्या गुरूंची बैठक मार्केट यार्ड येथील कुमार सिद्धाचल सोसायटी येथे हॅप्पी अॅनिमल्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते.
या वेळी साधू वासवानी मिशनच्या अरुणा जेठवानी यांनी सांगितले, की २५ नोव्हेंबर हा साधू वासवानी यांचा जन्मदिवस असतो. हा दिवस जागतिक शाकाहार दिवस म्हणून साजरा केला जातो.
कार्यक्रमाचे आयोजक हॅप्पी अॅनिमल्स असोसिएशनचे मनोज ओसवाल म्हणाले, की शाकाहार आमच्या कामाचा मुख्य आधार आहे. प्राणिप्रेम हे आता मुख्य प्रवाहाचा भाग बनले आहे. शाकाहार एक विशिष्ट धर्माचा नसून सगळ्याच धर्मांतील लोक शाकाहारी होऊ शकतात.
मुस्लिम विंग संस्थेचे अल्ताफ हुसैन म्हणाले, की मला मांसाहार खूप आवडत होता. पण जेव्हा मला हे समजले की यासाठी मुक्या प्राण्यांना किती वेदना सहन कराव्या लागतात, तेव्हापासून मी मांसाहार सोडून दिला. रोहिणी वीरायथन म्हणाले, की बायबलमध्ये असे लिहिले आहे, की माणसाला जेव्हा जन्म दिला, तेव्हा फक्त धान्य, फळ व बी दिले होते. माणसाने पाप करायचा निश्चय केला व त्याने मांस खाणे सुरू केले. मांसाहाराने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.
इस्कॉन संस्थेचे श्वेतदीपदास प्रभू म्हणाले, की पूर्ण जगामध्ये ६ कोटी लोकांना आम्ही शाकाहारी बनविले. चांगल्या चरित्रासाठी शाकाहार आवश्यक आहे. आमच्यासाठी जेवण हे जेवण नसून देवाचा प्रसाद आहे व आम्ही त्याला प्रसाद म्हणूनच ग्रहण करतो.