दूध प्या बिनधास्त, लम्पी रोगाचा मनुष्याला कसलाही धोका नाही; आरोग्यतज्ज्ञांचे मत

By संतोष आंधळे | Published: September 14, 2022 07:10 AM2022-09-14T07:10:48+5:302022-09-14T07:11:02+5:30

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार १२ सप्टेंबरपर्यंत २,२६४ पशुधनाला लम्पी स्किन आजाराची बाधा झाली असून ४३ जनावरे या आजाराचा बळी ठरली आहेत

Drink milk undisturbed, Lumpy disease poses no danger to man; Health expert opinion | दूध प्या बिनधास्त, लम्पी रोगाचा मनुष्याला कसलाही धोका नाही; आरोग्यतज्ज्ञांचे मत

दूध प्या बिनधास्त, लम्पी रोगाचा मनुष्याला कसलाही धोका नाही; आरोग्यतज्ज्ञांचे मत

googlenewsNext

मुंबई : पाळीव जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा आजार बळावत चालल्याने गायीचे दूध प्यावे की, नाही याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, घरी आलेले दूध उकळून प्यायल्यास या आजाराच्या फैलावाचा कोणताही धोका संभवत नसल्याचा निर्वाळा पशुवैद्यक तज्ज्ञांनी दिला आहे. लम्पी आजाराबाबत लोकांनी बाऊ न करता सावधगिरी बाळगावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, या आजारामुळे नजीकच्या काळात दुधाचे उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार १२ सप्टेंबरपर्यंत २,२६४ पशुधनाला लम्पी स्किन आजाराची बाधा झाली असून ४३ जनावरे या आजाराचा बळी ठरली आहेत. लम्पी हा विषाणूजन्य त्वचारोग आहे. विशेष म्हणजे बाधित जनावरांकडून दुसऱ्या जनावराला हा आजार होऊ शकतो. 

मानवामध्ये संक्रमित होण्याचा धोका नाही
पॅकबंद दूध पाश्चराइज्ड असते. ते डेअरीमध्ये उच्च तापमानावर तापविले जाते. त्यामुळे त्याच्यामध्ये विषाणू असण्याचा प्रश्नच नाही. तबेल्यातून थेट दूध घरी येत असेल तर ते मोठ्या प्रमाणात उकळून प्यावे. त्यामुळे दूध पिण्यातून कोणताही धोका संभवत नाही. हा आजार जनावरांमधून मानवामध्ये संक्रमित झालेला नाही, किंवा तसे कुठे आढळून आलेले नाही. - डॉ. राजीव गायकवाड, औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय

...तर दूध उत्पादन घटण्याची शक्यता 
आजच्या घडीला आजाराचे प्रमाण कमी आहे. मात्र, फैलाव होत आहे. आम्ही २० दिवस आधीच जनावरांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. आमच्याकडे दररोज ५ लाख ७५ हजार लिटर दूध येते. त्यात आजपर्यंत घट नाही. पण नजीकच्या काळात आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्यास उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. - मोहन येडूरकर, एमडी, वारणा सह. दूध उत्पादक संघ

विषाणू दुधात टिकाव धरत नाहीत
लम्पी त्वचाराेग दुधावाटे माणसांमध्ये पसरण्याच्या धास्तीने अकाेलेकरांनी गायीच्या दुधाकडे पाठ फिरवली आहे. गायीच्या पिशवीबंद दुधाच्या विक्रीत घट आल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. लम्पी आजाराचा विषाणू दुधात टिकाव धरत नसल्यामुळे दुधापासून काेणताही धाेका नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.

आजारी जनावरांच्या दुधापासून धोका नाही 
लम्पीग्रस्त जनावरांची धार काढताना हातमोजे, मास्क वापरणे गरजेचे आहे. पण अशा जनावरांचे दूध उकळून प्यायले तर अधिक चांगले, असा सल्ला पशुसंवर्धन विभागाचे निवृत्त सहायक आयुक्त डाॅ. व्यंकटराव घोरपडे यांनी दिला आहे. दुधाला गरम करून सेवन केले गेले तर त्याचे गुणधर्म आणखी वाढतात.  दूध जास्त उकळून घ्यावे. तसेच हळद टाकून पिल्यास अधिक उत्तम आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Drink milk undisturbed, Lumpy disease poses no danger to man; Health expert opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.