पिण्याच्या पाण्यावाचून तडफडतेय गाव..
By admin | Published: March 23, 2016 03:37 AM2016-03-23T03:37:25+5:302016-03-23T03:37:25+5:30
औसा तालुक्याहून १९ कि़मी. अंतरावर वसलेले मासुर्डी. खणेल तिथे पाणी, अशी या गावची ओळख. अडीच वर्षांपासून हे गाव शंभर टक्के टँकरवर आहे.
उसाच्या रानात ज्वारीही उगवेना -
औसा तालुक्याहून १९ कि़मी. अंतरावर वसलेले मासुर्डी. खणेल तिथे पाणी, अशी या गावची ओळख. अडीच वर्षांपासून हे गाव शंभर टक्के टँकरवर आहे.
२०१४ च्या आॅक्टोबर महिन्यात टँकर दिला गेला. जून-जुलै हे दोन महिने सोडले तर तो अखंड चालू आहे. मराठवाड्यात सलग एवढे महिने टँकर असलेले हे एकमेव गाव असावे. आजमितीला एक टँकर गावात चार फेऱ्या करते. त्यातल्या दोन दिवसा आणि दोन रात्री. गावापासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदाळा येथील माणिक शिंदे यांच्या शेतातील विहीर आणि १३ किलोमीटरवर असलेल्या शकुंतला पाटील यांच्या शेतातील अधिग्रहित बोअरमधून या गावाला पाणी दिले जाते. दोन्ही गावे भारनियमनाच्या कचाट्यात येतात. कुठे दिवसा तर कुठे रात्री भारनियमन येतेच. त्यामुळे टँकरच्या दोन खेपा दिवसा होतात, तर दोन रात्री. १२ वाजता लाईट आली की भरायला एक तास लागतो आणि रात्री दीड वाजता गावात टँकर येते. दुसरी खेप येत ती पहाटे साडेतीन वाजता. गाव देवाच्या पालखीसारखे बसून टँकरची वाट पाहत असते.
बुधवारी रात्रीही एक वाजून ३९ मिनिटाला गावात टँकर आला. टँकर गावात आला की अर्ध्या मिनिटात गाव जागे होते. बुधवारीही तसेच जागे झाले. रोबोटसारखी माणसे हातात पाईप आणि भांडी घेऊन टँकरवर तुटून पडली. लहान मुले, तरुण मुले, म्हातारी माणसे सगळ्यांचा टँकरभोवती एकच कल्ला रंगला. १२ हजार लिटरचा टँकर अवघ्या चार ते सव्वाचार मिनिटात रिकामा झाला. ज्याला पाणी भेटले त्याच्या चेहऱ्यावर सोने सापडल्याचा आनंद. ज्याला भेटले नाही त्याला पुढच्या चार दिवसाची चिंता. कारण गावात गल्लीनिहाय टँकरचे नऊ पॉर्इंट ठरलेले. एकदा एका पॉर्इंटवर टँकर आला की पुढची खेप तिथे जायला त्याला तीन दिवस हमखास लागतात. मग पाणी न मिळालेल्या गावकऱ्याला दुसऱ्याकडून हातउसने घेण्याशिवाय नाहीतर ५-१० कि़मी.वरून सायकलने रपेट करुन आणण्याशिवाय पर्याय उरत नाही.
टँकर भरायला सव्वातास; सव्वा चार मिनिटांत रिता
मासुर्डीत नियुक्त केलेला १२ हजार लिटरचा टँकर अधिग्रहण केलेल्या बोअरमधून पाणी उपसा करुन भरायला तास ते सव्वातास लागतो. मात्र हाच टँकर जेव्हा गावात येऊन उभा राहतो तेव्हा अवघ्या चार ते सव्वाचार मिनिटात रिता होतो.
टँकर आला की मुले
शाळा सोडून पाण्यावर !
गावात जिल्हा परिषदेची सातवीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत १२२ मुले शिकतात. ६९ मुले आणि ५३ मुली. गावात टँकर आला की टोल पडल्यासारखी मुले शाळा सोडून टँकरच्या दिशेने धाव घेतात. शिक्षकांनी अडविले तरी कुणी थांबत नाही. पाणी भरुन झाले की १५ मिनिटात पुन्हा शाळेत हजर होतात. विशेष म्हणजे परीक्षा चालू असतानाही मुलांनी हा नित्यक्रम बदलला नाही.
पाण्याच्या ‘पॉइंट’वर प्लास्टिकच्या टाक्या...
टँकर येऊन थांबणाऱ्या जागेत लोकांनी २०० ते २५० लिटरच्या प्लास्टिक टाक्या दोन्ही बाजूने रांगा लावून कायमस्वरुपी ठेवल्या आहेत. टँकर आला की लोक पाईप टँकरमध्ये सोडतात आणि आपापल्या टाक्या भरुन घेतात. त्यानंतर टाक्यांमधील पाणी घागरीने आपल्या घरी नेतात. सोने पिकविणारी जमीन, तरीही ५०० जणांचे स्थलांतर ! मासुर्डीची जमीन काळीभोर. ४० फूट खोदले तरी काळी माती लागते. म्हणजे सोने पिकेल अशी ही जमीन. फक्त पाऊस नसल्याने गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी फेऱ्यात सापडली आहे. शेती हाच प्रमुख व्यवसाय असलेल्या या गावाचे दुष्काळाने जगणे मुश्कील केले आहे. त्यामुळे कामधंद्याच्या शोधात ५० कुटुंबांतील तब्बल पाचशे जणांनी स्थलांतर केले आहे.
पाऊसच नसल्याने शेती बुडाली. जिथे उसाचे पीक यायचे तिथे ज्वारी, हरभरा, करडई, सोयाबीन असे कोणतेही पीक यंदा पिकले नाही. त्यामुळे शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडले नाही. सलग तीन वर्र्षे दुष्काळझळा भोगणाऱ्या गावातील लोकांनी मग रोजगारासाठी स्थलांतर केले. जवळपास ५० कुटुंबे लातूर, औरंगाबाद, पुणे आणि मुंबई अशा गावांनी जाऊन राहिली आहेत. प्रत्येक घरातील एक तरी तरुण रोजगारासाठी गेला आहे. यातील ८० टक्के स्थलांतर हे गेल्या दोन वर्षातील असल्याचे गावातील टेलर महादेव पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मुख्य मुद्दा म्हणजे जे लोक गाव सोडून गेले, त्या प्रत्येकाला जमीन आहे. कुणाला कमी कुणाला अधिक. किसन कोळ्यांचा कारभारी (२ एकर), हरिदास गरडांचा बालाजी (सात एकर), रंगा गरडांचा राजेंद्र (अडीच एकर), नामदेव गरडांचा प्रकाश (सव्वा एकर), काशीनाथ शेळकेंचा बाळासाहेब (पाच एकर), कालिदास पिंपरे (२ एकर), समाधान गव्हाणे (दीड एकर), रमेश शेळके (२ एकर), भागवत माने (दोन एकर), भागवत यादव (दोन एकर) आणि ज्ञानोबा काळे (४ एकर) ही त्यापैकीच एक. गावाने गाव सोडले, असेच हे चित्र. नव्या कोऱ्या घराला कुलूप
गावातील लहू सोपान मोरे यांनी गेल्या वर्षी आपल्या शेतवस्तीला टुमदार घर बांधले. टोलेजंग घरात राहून शेत जातीने कसता येईल, हा त्यांचा व्होरा. पण दुष्काळाने गणिते चुकविली. उत्पन्नच नसल्याने लहू मोरे यांनी गेल्या वर्षी नव्या कोऱ्या घराला कुलूप लावून पोटापाण्यासाठी गाव सोडले आहे. शेतमालक झाले सालगडी !
गाव सोडणारे सारे शेताचे मालक. त्यामुळे शेताच्या कामाशिवाय काहीच येत नाही. त्यामुळे फार थोड्यांनीच अगदी २० टक्के लोकांना कंपन्यांंत कामे मिळाली. उरलेली ८० टक्के माणसे पुण्या-मुंबईतील बांधकामावर बिगारीकाम नाहीतर पुणे, बारामती, औरंगाबाद अशा गावांतील बड्या शेतकऱ्यांच्या शेतावर सालगडी म्हणून कामाला लागली. मासुर्डी. औसा तालुक्यातील सहाशे उंबऱ्यांचे हे गाव पाण्याची मासुर्डी म्हणून पंचक्रोशीत प्रसिध्द होते. ‘खणेल तिथे पाणी लागेल’ अशा देवदत्त देणगीमुळेच मासुर्डी
हे नाव पडलेलं. दुष्काळचक्राने सारेच बदलले. या उसाच्या गावात गवताची काडीही नशीब काढेना. पाण्याच्या टँकरसाठी रात्र जागून काढावी लागतेय. रोजगार नसल्याने अनेकांनी गाव सोडलेय. २४ तास गावात राहून दिलेला हा ग्राऊंड रिपोर्ट. हे चित्र लातूर जिल्ह्यातील केवळ मासुर्डीत नाही. दुष्काळाच्या वाटेवर अशी अनेक गावे भेटतील. त्याचे हे केवळ प्रातिनिधिक स्वरूप.
>६० जणांच्या दावणीला एकच बैल
दुष्काळ कसा जिव्हारी येतो याचे उत्तम उदाहरण मासुर्डीत पाहायला मिळते. सर्जा-राजा, ढवळ्या-पवळ्या, राम-लखन, अशी शेतकऱ्यांकडच्या बैलजोडीची जोड. पण दुष्काळाने जनावरांची दावण रिती करून टाकली. शेतकऱ्याला बैलजोडीही जड झाली. गावात ६० माणसांच्या दावणीला एकच बैल दिसतो. मशागतीची कामे आल्यावर बैलाला दुसऱ्याच्या बैलाची जोड जोडून घेतात.
मासुर्डीत तीन वर्षापूर्वी सात हजारांच्या घरात जनावरे होती. आज अडीच हजारही नाहीत. शेतमजुरांकडेही जनावरे होती. महाग चारा परवडेना. प्यायला पाणीही मिळेना म्हणून ती बाजारात नेऊन विकली. गायी, म्हशी तर विकल्याच. दोन बैलाच्या शेतकऱ्यांनी आपला एकच बैठ ठेवला. दुसरा विकून टाकला. आपापला एक बैल सांभाळायचा. गरजेच्या वेळी दुसऱ्या शेतकऱ्याला आपला बैल द्यायचा, आपणही घ्यायचा हे नवे धोरण शेतकऱ्यांनी अवलंबिले. बापूराव संतराम पिंपरे आणि विठ्ठल संतराम पिंपरे हे दोन भाऊ एकेक बैल सांभाळतात. कुणालाही लागला तर एकत्र जुंपतात. दिलीप पिंपरे-गणपती काळे, दाजी पाटील-विश्वनाथ शेळके, श्रीपती शेळके-केरबा गरड, काशीनाथ माळी- रंगानाना डावकर या शेतकऱ्यांनी एकेक बैल सांभाळून दुसऱ्याबरोबर आपल्या बैलाची सांगड घातली आहे. यातील अनेक शेतकऱ्यांची ना घरे शेजारी-शेजारी आहेत ना शेते. तरीही नड ही त्यांची बचतीचा मार्ग झाली. गणपती शंकर आळणे म्हणाले की, मी चार वर्षापूर्वी ७० हजाराला जोडी घेतली. पण आता ना चारा ना पाणी. सांभाळायची कशी म्हणून ४० हजाराला विकून टाकली. ‘लोकमत’ टीम आली आणि ‘गुड न्यूज’ही...
दुष्काळाचे अनुदान मंजूर होऊन दोन महिने झाले होते. परंतु ते मिळाले नव्हते. बुधवारी लोकमतची टीम गावात पोहोचली. पाठोपाठ बँकेच्या खात्यावर अनुदान जमा झाल्याची ‘गुड न्यूज’ पोहोचली. शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व्यंकट गरड म्हणाले, ‘आपला पायगुण चांगला आहे. ७०५ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५६ लाख ५७ हजार २३६ रुपये जमा झाले आहेत.’
> उसाचे गाव कोरडे !
मासुर्डीच्या पोटात बक्कळ पाणी, असे म्हणून अनेक शेतकऱ्यांनी विहिरी आणि बोअरचा धडाका लावला. गेल्या ३५ वर्षात मासुर्डीत ऊस हे प्रमुख पीक होते. प्रत्येक वावरात विहीर नाहीतर बोअर ठरलेली. ३५ वर्षातील बेसुमार उपशामुळे रिती झालेली धरणीमायची ओटी आणि तीन वर्षापासून पावसाने दिलेली हूल यामुळे उसाचे जाऊ द्या, ज्वारीचे धाटही यंदा उगविले नाही.
जिथे काळ्या मातीत सोयाबीन लावला तरी एकरी १५-२० पोत्याच्या खाली उतारा मिळायचा, तिथे एकरी अर्धे पोतेही झाले नाही. बियाणांचाही पैसा न निघाल्याने साखरेत लोळलेल्या मासुर्डीतील शेतकऱ्यांना हे संकट नवीनच वाटते आहे. मासुर्डी हे शंभर टक्के उसाचे गाव. किल्लारी कारखाना निघाला तेव्हा या गावचे १२० शेअर्स होते. एवढे शेअर्स तर आमच्याहून दुप्पट मोठे असलेल्या आशिव आणि टाक्याचेही नव्हते. बेलकुंड मंडळात २०१३ साली सरासरी ६३१ मिमी, २०१४ साली सरासरी ३६४ आणि २०१५ साली २७३ मिमी पावसाची नोंद झाली. प्रत्यक्षात मासुर्डीत यातील अर्धाही पाऊस नाही. गावाला १० -१५ फुटाचा नाला सोडला तर नदी नाही. उच्च प्रतीची जमीन आणि जमिनीच्या पोटात पाण्याचा अमर्याद साठा त्यामुळे गावात ऊसवाले शेतकऱ्यांनी गेल्या ३५ वर्षात साखर खाल्ली. पैशाच्या गावात या पाण्याअभावी आता ज्वारीचे पीकही येत नाही. ९० टक्के शेतकरी कर्जबाजारी !
गावातील ९० टक्के शेतकरी हे कर्जबाजारी आहेत. उसाने लावली ही सवय. कर्ज घ्यायची आणि फेडायची अशी दानत या गावात होती. पैसा उधळून व्यसनात शेती घालविलेला गावात शोधूनही सापडणार नाही. लेकरा-बाळाची लग्न सोडली तर आमच्या गावाला खर्च माहीत नाही. तीन वर्षे झाली. यातील ८० टक्के कर्जे थकलीत, अशी माहिती माजी चेअरमन बाळासाहेब काळे यांनी दिली.
गावात तीन हजार बोअर, पाणी प्यायलाही नाही
७० विहिरी असल्याचे तलाठी सीमा उंबरे यांनी सांगितले. प्रत्यक्षात गावात ४५० हून अधिक विहिरी. बोअर किती घ्यावेत, किती खोल घ्यावेत याचाही हिशेब नाही. एका एका शेतकऱ्याने आठ-आठ, नऊ-नऊ बोअर घेतले. तेही ७०० ते ८०० फुटांपर्यंत. भास्कर शेळकेंनी आठ एकरात १३ बोअर घेतले. दत्तात्रय पाटलांनी ६० एकरात चौदा. आता साऱ्यांचे बोअर कोरडेठक्क आहेत. गेल्या १५ वर्षातच बोअर पाचपट झाले. गावात किमान तीन हजार बोअर सापडतील. पण पाणी दहा बोअरलाही नाही. आजमितीला ७२२ पैकी एकाच्याही शिवारात पीक नाही. बागायती गाव गेल्या तीन वर्षात शंभर टक्के जिरायती झाल्याची
खंत शेषराव पिंपरे यांनी व्यक्त केली.