श्रमिकांना छत्तीसगडला सोडून माघारी परतताना चालकाचा हृदयविकाराने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 05:20 AM2020-05-31T05:20:38+5:302020-05-31T05:20:46+5:30
मूळचे नागपूरचे । मालेगाव येथे मृत्यू
बोर्डी : मुंबईहून मजुरांना छत्तीसगडला सोडून माघारी येताना डहाणू बस आगाराचे चालक स्वप्निल गुलाबराव उके (३४) यांचा शुक्रवारी मालेगावनजीक हृदयविकाराने मृत्यू झाला. ते मूळचे नागपूरच्या उमरेड तालुक्यातील रहिवासी असून नोकरीनिमित्त डहाणूच्या कासा येथे पत्नी व तीन वर्षाच्या मुलासह राहात होते.
डहाणू बस आगारातून मंगळवार, २६ मे रोजी दुपारी दहा बसगाड्या मुंबईच्या दहिसरला पोहचल्या. त्यामध्ये उके हे होते. तेथून श्रमिकांना घेऊन छत्तीसगडच्या देवरी बॉर्डर येथे श्रमिकांना सोडल्यानंतर ते माघारी परतताना, झोडगे ता. धुळे येथे उके यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्या सोबतचे चालक गोकुळ देवरे हे त्यांना झोडगे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यास सांगितले.
परंतु तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी पाठविण्यात आले असून डहाणू आगराकडून त्यांना श्रद्धांजली वाहिल्याची माहिती आगार व्यवस्थापक राजू पाटील यांनी दिली.