कारचालकाने हवालदाराला उडविले
By Admin | Published: January 19, 2015 04:45 AM2015-01-19T04:45:05+5:302015-01-19T04:45:05+5:30
वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्ताने महानगरातील वाहनधारकांना सुरक्षित वाहतुकीचे धडे दिले जात असताना एका कारचालकाने ट्रॅफिक हवालदाराला उडविण्याची घटना
मुंबई : वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्ताने महानगरातील वाहनधारकांना सुरक्षित वाहतुकीचे धडे दिले जात असताना एका कारचालकाने ट्रॅफिक हवालदाराला उडविण्याची घटना रविवारी दुपारी मुलुंड येथे भक्ती पार्क मार्गावर घडली. विजय बळंवत पवार असे जखमी पोलिसाचे नाव असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी कारचालक अमोल मोहनलाल ठक्कर (२६) याला अटक करण्यात आली असून, हवालदाराची प्रकृती स्थिर असल्याचे वाहतूक शाखेचे (पोलीस उपायुक्त, उपनगर) आनंद मंडया यांनी सांगितले. वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्ताने गेल्या ३ दिवसांपासून विविध उपक्रम सुरू आहेत. मुलुंड वाहतूक चौकीतील हवालदार पवार बंदोबस्त करीत असताना भक्ती पार्क मार्गावरील एका शाळेच्या प्रवेशद्वाराजवळून ठक्कर हा मोबाइलवर बोलत कार चालवित होता.
मोटारसायकलवरून पाठलाग करून त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने ठोकर दिली. यामध्ये पवार खाली पडल्याने त्यांच्या डाव्या बाजूच्या खांद्याला व डोळ्याला दुखापत झाली. (प्रतिनिधी)