इफेड्रिन प्रकरणी चालक गजाआड
By admin | Published: January 28, 2017 03:50 AM2017-01-28T03:50:56+5:302017-01-28T03:50:56+5:30
कोट्यवधी रुपयांच्या इफेड्रिन प्रकरणातील मुख्य आरोपी किशोरसिंग राठोड याचा चालक भरत कथिया याला गुजरात पोलिसांनी मंगळवारी अटक
ठाणे : कोट्यवधी रुपयांच्या इफेड्रिन प्रकरणातील मुख्य आरोपी किशोरसिंग राठोड याचा चालक भरत कथिया याला गुजरात पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ठाणे पोलीस शोधात असलेल्या आठ आरोपींपैकी हा एक असून त्याला ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त भरत शेळके यांनी दिली.
ठाणे पोलिसांनी एप्रिल २०१६ मध्ये सोलापूर येथील एव्हॉन फार्मा लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडवर धाड टाकून कोट्यवधी रुपयांचे इफेड्रिन (अमली पदार्थ) हस्तगत केले होते. अमली पदार्थांचा हा साठा सोलापूरहून गुजरातला आणि गुजरातहून केनियाला पाठविण्याची व्यवस्था भरत कथिया करणार होता. परंतु, तत्पूर्वीच ठाणे पोलिसांनी तो साठा जप्त केला.
ही कारवाई केली तेव्हापासून किशोरसिंग राठोड आणि त्याचा चालक कथिया फरार झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही आठवडे ते सोबत होते. परंतु, नंतर अटक टाळण्यासाठी ते वेगवेगळ्या दिशांनी फरार झाले. या काळात मध्य प्रदेश आणि पंजाबसह इतर काही राज्यांमध्येही कथियाने वास्तव्य केले.
मोबाइल फोनचा वापर पूर्णत: टाळल्याने त्याला अटक करणे कठीण झाले होते. मित्रांच्या मदतीने तो अधूनमधून कुटुंबाची ख्यालीखुशाली जाणून घ्यायचा. कथिया सध्या गुजरात पोलिसांच्या कोठडीत आहे. तपासकामी त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया ठाणे पोलिसांनी सुरू केली आहे. या आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर या प्रकरणातील आणखी महत्वाची माहिती हाती येईल, असे ठाणे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)