रंगांधळेपण असणारे चालक सेवेत नाहीत
By admin | Published: July 15, 2016 03:24 AM2016-07-15T03:24:00+5:302016-07-15T03:24:00+5:30
रंगांधळेपण असलेल्या १९८ चालकांना एसटी महामंडळाकडून अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र ते अनुवंशिक असल्याने वाहनचालकांचा काही दोष नसल्याचे पुढे आले.
मुंबई : रंगांधळेपण असलेल्या १९८ चालकांना एसटी महामंडळाकडून अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र ते अनुवंशिक असल्याने वाहनचालकांचा काही दोष नसल्याचे पुढे आले. याबाबत गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी चालकांना सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनानंतरही ‘त्या’ चालकांना अद्यापही सेवेत सामील करून घेतलेले नाही. याविषयी लवकरच निर्णय होईल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.
राज्यभरातील १९८ बसचालकांना रंगांधळेपण असल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र हा निर्णय वाहनचालकांवर अन्याय करणारा असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली. या निर्णयाची भविष्यात फारतर अंमलबजावणी करावी. परंतु यापूर्वी घडलेल्या अशा घटनांबाबत सहानुभूतिपूर्वक विचार करून ठाणे, रत्नागिरी विभागातील बस वाहनचालकांसह सेवेतून कमी केलेल्या वाहनचालकांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत अपवादात्मक बाब म्हणून शासनाला निर्देश देण्याची मागणी गेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात करण्यात आली. रंगांधळेपणा व रातआंधळेपणा हे अनुवंशिक असल्यामुळे संबंधित वाहनचालकांचा काही दोष नसल्याचेही त्या वेळी स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार ज्यांना सेवेतून कमी केलेले आहे त्यांना सेवेत सामावून घेण्याचे निर्देश सभापतींकडून देण्यात आले होते. त्या वेळी परिवहन मंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सेवेत सामावून घेण्याचे आश्वासनही दिले. तरीही चालकांना सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. यासंदर्भात एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांना विचारले असता, एसटी बोर्डाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे. लवकरच त्यावर परिपत्रक काढण्यात येईल, अशी माहिती दिली. (प्रतिनिधी)