पालखी सोहळ्यात ड्रोनवर बंदी
By admin | Published: June 13, 2016 01:10 AM2016-06-13T01:10:22+5:302016-06-13T01:10:22+5:30
ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रणावर बंदी घातल्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्यातही असे चित्रण करता येणार नाही, असा निर्णय आळंदी पोलिसांनी घेतला
आळंदी : संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्यात ड्रोन
कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रणावर बंदी घातल्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्यातही असे चित्रण करता येणार नाही, असा निर्णय आळंदी पोलिसांनी घेतला आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांचा पालखी सोहळा २८ जूनपासून सुरू होत आहे. पालखी प्रस्थान, ग्रामप्रदक्षिणा, आजोळघरी मुक्काम आदी प्रसंगांची चलचित्रे आकाशातूनही आपल्या कॅमेऱ्यात कैैद करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव सोहळ्यात ड्रोन कॅमेरा वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीचे उल्लंघन करून ड्रोन कॅमेरा वापरणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होणारे लाखो वारकरी हे मुख्यत: ग्रामीण महाराष्ट्रातील असतात. त्यांना ड्रोनसारख्या अत्याधुनिक कॅमेऱ्यांबद्दल माहिती नसते.
गर्दीत डोक्यावरून उडणारे हे अजब यंत्र पाहून ते घाबरून जाऊ शकतात. घातपात होणार असल्याच्या अफवा पसरून चेंगराचेंगरीही होऊ शकते. दहशतवादीही ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून घातपात घडवू शकतात. यामुळे पोलीस प्रशासनाने पालखी प्रस्थानकाळात ड्रोनच्या वापरास बंदी घातली आहे. तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे.
(वार्ताहर)
>पालखी सोहळ्यात ड्रोनच्या वापरावर आळंदी पोलिसांनी बंदी घातली आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. मात्र जर एखाद्या छायाचित्रकार व संस्थेने ड्रोन वापराबाबत जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आणल्यास त्यांना अडविले जाणार नाही. निर्बंधाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर तत्काळ कारवाई केली जाईल.
- नंदकुमार गायकवाड,
सहायक पोलीस निरीक्षक,
आळंदी पोलीस स्टेशन