दीर्घकालीन उपायांसाठी दुष्काळ पाहणी
By admin | Published: August 20, 2015 12:36 AM2015-08-20T00:36:48+5:302015-08-20T00:36:48+5:30
दुष्काळावर मात करण्यासाठी स्वतंत्र आराखडा केंद्राकडून तयार करण्यात येत असून, त्यासाठी दुष्काळी भागाची पाहणी करण्यात येत असल्याचे
अहमदनगर : दुष्काळावर मात करण्यासाठी स्वतंत्र आराखडा केंद्राकडून तयार करण्यात येत असून, त्यासाठी दुष्काळी भागाची पाहणी करण्यात येत असल्याचे केंद्रीय पथकाचे प्रमुख व्ही़ रथ यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले़
केंद्राच्या दुष्काळ व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त आयुक्त व्ही़ रथ यांच्या नेतृत्वाखाली द्विसदस्यीय समिती बुधवारी नगर दौऱ्यावर आली होती़ जिल्ह्यातील पाथर्डी,पारनेर आणि नगर तालुक्यातील दुष्काळी गावांची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़
बदललेल्या हवामानाबाबत रथ यांनी चिंता व्यक्त केली़ कमी पावसामुळे जिल्ह्यातील मूग, मका, सोयाबीन, बाजरी आणि फळबागा वाया गेलेल्या आहेत़ ही स्थिती केवळ नगर जिल्ह्यातच नव्हे तर देशातील काही भागातही असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे यावर दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे झाले आहेत़ बदलत्या हवामानामुळे पावसाचे प्रमाण घटले आहेत़ पाऊस कमी झाल्याने शेती व्यवसाय मोडकळीस आला आहे़ दुष्काळावर मात करण्यासाठी पंतप्रधान सिंचन योजना तयार करण्यात येत आहे़ नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या योजनेत जलसंधारणाच्या सर्व योजनांचा समावेश असणार आहे़ ही योजना तयार करण्यापूर्वी देशातील दुष्काळाची स्थितीची पाहणी करुन वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सर्व राज्यांतील जिल्ह्यांची पाहणी करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले़ त्यामुळे अनुदानाच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. (प्रतिनिधी)